आम आदमी पार्टी उत्तरप्रदेशात निवडणूक लढवणार
आम आदमी पार्टी उत्तरप्रदेशात आगामी 2022 मध्ये होणा-या निवडणुकीत सहभागी होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी केजरीवाल म्हणाले की, उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाला सत्ता मिळाली आहे. परंतु त्यांनी केवळ स्वतःची घरे भरली. राज्यातील नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीत यावे लागले. उत्तर प्रदेशामधील सर्वच पक्षांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना धोका दिला आहे. प्रत्येक सरकारने भ्रष्टाचारात एकदुसऱ्यांवर मात केली आहे. दिल्लीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांनी आम्हाला सांगितले की दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशलादेखील प्रत्येक प्रकारचा लाभ मिळाला पाहिजे आणि लोकांचे कल्याणही झाले पाहिजे असे केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात योग्य ध्येय असलेल्या राजकारणाची कमतरता आहे. ते केवळ आम आदमी पार्टीच देऊ शकते. उत्तर प्रदेशच्या चुकीच्या राजकारणाने आणि भ्रष्ट नेत्यांनी उत्तर प्रदेशला विकासापासून दूर ठेवले. ज्या सुविधा दिल्लीत लोकांना मिळत आहेत त्या आजही उत्तर प्रदेशातील लोकांना मिळत नाहीत. उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यात त्या ठिकाणीही दिल्लीप्रमाणेच विकासाचं मॉडेल लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.