अभाविपचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात २५आणि २६ डिसेंबर रोजी डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. या दोनदिवसीय अधिवेशनाचे उद््घाटन २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते होईल. नागपुरात तब्बल २५ वर्षानंतर हे अधिवेशन होत आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे अभाविपच्या इतिहासात पहिल्यांदाच हे अधिवेशन आभासी पद्धतीने आयोजित होत आहे. संपूर्ण देशातून जवळपास चार हजार स्थानांवर हे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने होत असून यात हजारो विद्यार्थी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी २0२0-२१ च्या शैक्षणिक सत्राकरिता अभाविपच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गुजरातचे छगनभाई पटेल यांची तर राष्ट्रीय महामंत्री म्हणून दिल्लीच्या निधी त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या राष्ट्रीय अधिवेशनात ते कार्यभार स्वीकारतील. सोबतच अभाविपतर्फे राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्रतिष्ठेचा प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार २0२0 बिहार राज्यातील वैशालीचे युवा कार्यकर्ते मनीष कुमार यांना प्रदान केला जाईल. दोन दिवस चालणार्या या अधिवेशनात विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर चर्चा होणार असून देशातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सद्यस्थितीवर प्रस्तावदेखील मांडले जातील. हे अधिवेशन विद्यार्थी परिषदेच्या कार्याला दिशा देणारे व संघटनात्मक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रांत कार्यालय मंत्री दुर्गेश साठवणे यांनी ही माहिती दिली.