बेडची व्यवस्था व लसीकरणाच्या मोहिमेला गती द्या

Share This News

नागपूर
कोरोना रुग्णांसाठी नागपूर जिलतील रुग्णालयांमध्ये वाढीव बेडची व्यवस्था तसेच कोरोना लसीकरणाची मोहिम प्राधान्याने राबवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हय़ातील कोरोना रुग्ण व उपचाराच्या उपाययोजनांचा आढावा घेतांना पालकमंत्री बोलत होते. पशु संवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, ग्रामीण पोलिस आयुक्त राकेश ओला व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यावेळी उपस्थित होते.
नागपूर जिल्हय़ात दररोज ७ हजार रुग्णांची भर पडत असल्याने रुग्णालयात वाढीव बेडची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मानकापूर येथील क्रीडा संकुलात तसेच महापालिकेच्या रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या संदर्भात उपाययोजना झाली असून भिलाई स्टिल प्लांट, राऊरकेला येथून तसेच नागपुरातील ११ प्लांटमधून शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रुग्णालयांचे फायर ऑडिट करा
राज्यातील काही रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या तसेच ऑक्सिजन गळती होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे काहीजणांचे प्राण गेले. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हय़ातील सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण करावयाचे असल्याने या मोहिमेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शहरात १८७ व ग्रामीण भागात १७७ लसीकरण केंद्र असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण आवश्यक असून जिल्हय़ातील दररोज १ लाख जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे व त्यानुसार केंद्र सरकारकडे लसीची मागणी करावी, असेही सांगण्यात आले.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.