खामगावजवळ दुचाकीस्वारांना उडवून टँकर दुकानांवर धडकला

Share This News

बुलडाणा : दुचाकीस्वारांना धडक देत व रस्त्यावरील दुभाजक तोडून एक टँकर थेट दोन दुकानांना धडकल्याची घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास खामगाव येथे नांदुरा रोडवर घडली. यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोन दुकानांचं मोठं नुकसान झाले आहे. मद्यधुंद चालकामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले आहे.
अपघातग्रस्त टँकर नांदुराहून येत होता. खामगाव जवळ असताना रस्त्यावरील दुचाकीस्वारांना उडवत हा टँकर काही अंतरावरील दुभाजक तोडून थेट दोन दुकानांवर जाऊन धडकला. या धडकेमुळे दुकानाला लागून असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तारा देखील तुटल्या. यावेळी रस्त्यांवर नागरिक नसल्याने सुदैवाने मोठी हानी टळली.
टँकरनं धडक दिलेले हॉटेल व हेअर सलूनचे मोठे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी, या टँकरने काही अंतरावर एका ट्रॅव्हल्सला देखील कट मारल्याने मोठा अपघात टळल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसात योगेश निंबाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टँकर चालक राजेंद्र यादव (रा. बानोसा झारखंड) याच्याविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास खामगाव पोलीस करीत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.