भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक
काटाेल : भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील आजाेबासह नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-सावरगाव मार्गावरील डाेंगरगाव परिसरात मंगळवारी (दि. ५) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. मन्नू अल्लाउद्दीन खान (६५) व फरहान खान (१२ दाेघेही रा. साेटिया, जिल्हा सिहाेर, मध्यप्रदेश) अशी मृत आजाेबा व नातवाचे नाव आहे. मन्नू अल्लाउद्दीन खान यांचे काटाेल शहरात नातेवाईक राहतात. त्यांच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्याने ते फरहानला साेबत घेऊन एमपी-३७एमआय-४१३२ क्रमांकाच्या माेटारसायकलने पांढुर्णा, वडचिचाेली, सावरगावमार्गे काटाेलला येत हाेते. सिहाेर ते काटाेल हे अंतर जवळपास २५० किमी आहे. ते सावरगावहून काटाेलच्या दिशेने येत असतानाच डाेंगरगावजवळ काटाेलहून सावरगावच्या दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या माेटारसायकलला धडक देत काही दूर फरफटत नेले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या मार्गावरून सतत रेतीची वाहतूक सुरू असते. धडक देऊन निघून गेलेला टिप्परदेखील रेतीचा असावा, अशी शक्यता काही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.