तिरोड्यात रुग्णालयाची तोडफोड;आरोपी ताब्यात

Share This News

तिरोडा : खैरलांजी मार्गावरील दया हॉस्पिटलमध्ये एका गंभीर रूग्णाला उपचारासाठी चार इसमांची आणले. रुग्णाची तपासणी केल्यावर तो गंभीर असल्यामुळे व बेड रिक्त नसल्यामुळे डॉक्टरांनी गोंदियाला हलविण्याचा सल्ला दिला. पण रूग्णाला भरती का करीत नाही, असा मुद्दा उपस्थित करून चारही आरोपींनी हॉस्पिटलची तोडफोड केली. तसेच डॉक्टरला मारहाण करून धमकी दिली. ही घटना सोमवार, 12 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणातील चारही आरोपींना तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेंद्र परिहार रा. बोदा अत्री, संजयकुमार प्रीतीचंद येडे, अनिलकुमार प्रीतीचंद येडे व जितेंद्र प्रीतीचंद येडे तिन्ही रा. पार्डी नागपूर यांचा समावेश आहे.

फिर्यादी डॉ.संदीप विठ्ठलराव मेश्राम रा. झाकीर हुसेन वॉर्ड तिरोडा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते 12 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास दया हॉस्पिटल खैरलांजी रोड तिरोडा येथे हजर होते. त्यावेळी खैरबोडी येथील रूग्णाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. फिर्यादी यांनी रूग्णाला तपासून तो गंभीर आहे, बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला गोंदियाला घेऊन जा, असा सल्ला दिला.

मात्र, रुग्णाला भरती का करीत नाही म्हणून सदर चारही आरोपींनी फिर्यादीला थापडाने मारहाण केली. फिर्यादीच्या कॅबिनच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्सीजन सिलेंडर लात मारून खाली पाडले. रुग्णाच्या बेडला लात मारून हिंसक कृत्य करून दवाखान्यातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करून 50 हजार रूपयांचा नुकसान केलेला आहे. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिलेली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 452, 427, 323, 504, 506, 34 सहकलम 4 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था (हिंसक कृत्य व मालमत्ता हानी व नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हनवते करीत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.