अकोल्यात सहा कोविड रुग्णालयांवर कारवाईचा बडगा

Share This News

अकोला : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवरील उपचारांत अनियमितता आढळून आल्याने व सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केले गेल्याने अकोला येथील सहा रुग्णालयांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही कारवाई केली आहे.
अकोला शहरात ३३ रुग्णालयांत कोविड सेंटर चालवण्यात येते. या ठिकाणी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली आहे. या समितीनं सोमवारी सिटी हॉस्पिटल (रामदास पेठ), आधार हॉस्पिटल (नवीन बसस्टॅण्ड जवळ ), हार्मोनी हॉस्पिटल (माऊंट कारमेल शाळेजवळ), श्री गणेश हॉस्पिटल (रतनलाल प्लॉट चौक), डॉ. भिसे यांचा दवाखाना (जयहिंद चौक ) तसंच, सिव्हिल लाईन चौकातील बिहाडे हॉस्पिटलमधील रुग्णसेवेची पाहणी केली. संबंधित रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून आले. रुग्णांच्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन टेस्ट उशिराने झाल्या होत्या. काही अहवाल प्रलंबित होते, तर काही चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही जिल्हा प्रशासनास त्याबाबत कळविले गेले नसल्याचे आढळून आले. कोविड चाचणी निगेटिव्ह व एचआरसीटी स्कोअर जास्त असताना रुग्णांना शासनाच्या रुग्णालयात वा कोविड रुग्णालयात हरविण्याऐवजी नातेवाईकांच्या संमतीशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर केला गेल्याचे निदर्शनास आले.
या सर्व प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकारी पापळकर यांनी घेतली. तसंच, या रुग्णालयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. यापुढं अशी अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. बिहाडे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाकडून जास्त पैशांची मागणी केल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम संबंधित रुग्णाला परत देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.