रेतीची वाहतूक करणार्‍या 23 बैलगाड्यांवर कारवाई Action taken against 23 bullock carts transporting sand

Share This News

सडक अर्जुनी- तालुक्यात रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने घरकुलांसह विविध शासकीय, निमशासकीय बांधकामांना रेती मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत गरजवंत घरकूल लाभार्थी बैलगाडीच्या माध्यमातून रेतीची वाहतूक करीत आहेत. मंगळवार, 16 मार्च रोजी तहसीलदार्‍यांच्या भरारी पथकाने रेतीची वाहतूक करणार्‍या 23 बैलगाड्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला.बांधकामात रेती हा घटक महत्त्वाचा आहे. आज गरीबांपासून तर श्रीमंतांपर्यंत विटा, रेती, सिमेंटच्या घरांचे बांधकाम करतात. प्रधानमंत्री यांच्या घोषणेनुसार सन 2022 पर्यंत सर्व गरजवंतांना निवारा देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात हजारो गरजवंतांना घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहे.
मात्र बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नसल्याने अनेकांची घरकुलांची कामे रखडली आहेत. अशा स्थितीत एका घरकूल लाभार्थ्यांला शासनाने पाच ब्रास रेती विनामूल्य उपलब्ध करून देण्याची जवाबदारी तहसीलदार यांना दिली आहे. परंतु गोंदिया, तिरोडा वगळता इतर तालुक्यांमध्ये घरकूल लाभार्थ्यांसाठी रेतीघाट निर्धारित करण्यात आलेले नाही. रेती घाट लिलाव प्रक्रिया झालेली नसल्याने रेतीचे दर गगनाला भिडले आहेत.

सर्वसामान्य घरकूल लाभार्थ्यांना 25 ते 30 हजार प्रति टिप्पर प्रमाणे रेती घेणे परवडणारी नसल्याने अशा स्थितीत गरजवंत लाभार्थी बैलगाडी च्या माध्यमातून रेतीची वाहतूक करीत आहे. मंगळवार, 16 मार्च रोजी तालुक्यातील वडेगाव आणि सौंदड येथे चुलबंद नदीपात्रातून बैलगाडीने रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती सडक अर्जुनीचे तहसीलदार रमेश खोकले यांना मिळाली. त्यांनी पथकासह वडेगाव येथील 9 बैलगाडी तर सौंदड येथील 14 बैलगाड्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून 30 हजार रुपयांचे दंड वसूल केला. या कारवाईने मात्र घरकूल लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.