वाहनविषयक कामांसाठी आता ‘आधार’ अनिवार्य Aadhaar is now mandatory for automotive works

Share This News

पुणे,दि.05ः- प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या विविध सेवा ऑनलाइन आणि डिजिटल करण्यात आल्यानंतर संपर्करहित सेवेच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे.
त्यानुसार वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना किंवा वाहनांविषयक विविध कामांसाठी आधार कार्डची जोडणी आवश्यक होणार आहे.
त्याबाबतची अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आली आहे.नागरिकांशी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जवळपास सर्वच सेवा सध्या ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यापासून वाहनांच्या नोंदणीपर्यंतच्या जवळपास सर्वच सेवांसाठी सध्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेतले जातात.
त्यानंतरही अर्जदाराला प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन स्वाक्षरी किंवा इतर काही कामे करावी लागतात.संपर्करहित सेवा करण्याच्या दृष्टीने सध्या डिजिटल स्वाक्षरीचाही पर्याय देण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून विविध सेवांसाठी आधार जोडणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, वाहन परवाना आणि वाहनांशी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आधार जोडणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिकाऊ वाहन परवाना, चाचणी आवश्यक नसलेल्या वाहन चालन परवान्याचे नूतनीकरण, दुबार वाहन चालन परवाना, परवान्यावरील पत्ता व इतर बदल, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना, वाहनांची तात्पुरती नोंदणी, नोंदणीचे दुबार व नोंदणी प्रमाणपत्रासाठी ना हरकत प्रमाणपत्र, वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्त्यातील बदल, मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षणासाठी परवान्याचा अर्ज आदींसह भाडे किंवा खरेदी करारासंबंधीच्या सेवांबाबत संबंधितांना आधार जोडणे बंधन कारक आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.