कुमारावस्थेतील समस्या व निवारण Adolescent problems and solutions.

Share This News

पौगंडावस्था म्हणजे तारुण्याचा उंबरठा .. या वयातील मुलींचा विचार केला तर त्या नधड बाल्यावस्थेत ना धड प्रौढावस्थेत… शारीरिक व मानसिक परिपक्वतेचा हा एक टर्निंग पॉइंट म्हणून या कसोटीच्या काळात जर मुलांना सावरले तर ती मुलं मुली पुढे एक व्यक्ती म्हणून समतोल व विचारी प्रौढ अवस्थेत प्रवेश करेल यात शंका नाही…
मुलीच्या जन्मापासून ती तारुण्यात पदार्पण करेपर्यंत तिच्यामध्ये विविध बदल घडून येतात पुढे विवाह गर्भधारणा यासारखे अनेक प्रश्न समोर येतात, बहुतेक वेळा ह्या प्रश्नांना मागे संकोच लपलेला असतो. छोट्या छोट्या शंका निवारण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणे अवघड वाटते. बराच वेळा समवयस्क यांच्या माध्यमातून अर्धवट व अशास्त्रीय माहिती मिळण्याची शक्यता असते. स्त्री शरीर रचना, शारीरिक समस्या, लैंगिक शिक्षण व इतर बर्‍याच प्रश्नांची माहिती असणे आवश्यक आहे.
पौगंडावस्था हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो, याच काळात व्यक्ती पुनरुत्पादन क्षमता बनते. मुलींमध्ये साधारणतः बारा वर्षे वय व मुलांमध्ये 14 वर्षे वयानंतर ही अवस्था येते. पौगंडावस्थेत बाह्य शारीरिक बदल होऊन अंतर्गत व बाह्य लैंगिक अवयवांचा विकास होऊ लागतो त्याच काळात अनेक मानसिक व भावनिक बदल घडून येतात.
मेंदूमधील पियुषिका ग्रंथीच्या स्त्रावामुळे शरीराची वाढ होते तसेच आडरिनल ग्रंथीचे कार्य ही वाढते.

याबरोबरच आतापर्यंत सुप्त असलेले बीजकोष म्हणजे ओवरी सुद्धा उत्तेजित होण्यास सुरुवात होते. जेव्हा बीज निर्मिती सुरू होते तेव्हा इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या दोन स्त्रावामुळे स्त्रीला दर महिन्याला पाळी येते. पहिली मासिक पाळी येण्याआधी स्तनांची काही प्रमाणात वाढ झालेली असते व जननेंद्रियावर केस येण्यास सुरुवात झालेली असते या विकासानंतर साधारण दोन वर्षांनी पहिली पाळी येते यास मिनारके असे म्हणतात.स्तनांची उर्वरित वाढ व काखेतील केस हे पाळी आल्यानंतर काही कालावधीनंतर येतात.
या वयात मुलीला उत्साहवर्धक अशा कामात गुंतवून ठेवणे हे काम पालकांनी करायला पाहिजे, मुली त्यांच्या शरीरातील विविध बदलांमुळे भांबावून जातात म्हणून पालकांनीच मुलीची मानसिक स्थिती ओळखून तिला भावनिक आधार द्यावा.मुलींना जेव्हा पहिली पाळी येते त्यामुळे मनात एक मानसिक कल्लोळ निर्माण झालेला असतो त्याकरिता लैंगिक शिक्षणाची गरज आहे. अशावेळी मुलांना त्यांच्या सोप्या व कळेल अशा भाषेत समजावून सांगावे.
वयाच्या 10 ते 15 वर्ष या काळात मेंदूमध्ये काही हार्मोन्सची वाढ होते यातलाच एक म्हणजे ग्रोथ हार्मोन व थायरोक्सिन यामुळे शरीरातील एकंदरीत चयापचय क्रिया वाढते म्हणून याच काळात शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास वेगाने होतो.म्हणून या काळात समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आहारातील घटक जर योग्य प्रमाणात नसतील तर पुढे शरीर कमकुवत बनते. हा काळ पायाभरणीचा असतो म्हणून या काळात योग्य ते पोषण होणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
याच काळात हाडांची बळकटी वाढते तसेच उंची वाढलेली दिसून येते. स्नायूंना ही पुष्टता येते व काही ठिकाणी चरबी जमा होते. बौद्धिक व वैचारिक परिपक्वता होण्यास सुरुवात होते. शरीरातील रसग्रंथी चे कार्य वेगाने होऊन योग्य हार्मोन्स स्त्रावित झाल्यास गर्भाशय, बीजांडे, स्तन इत्यादी अवयवांचा योग्य विकास होतो.
किशोरवयीन मुली अनेक शारीरिक व मानसिक अडचणीतून जात असतात त्या आपल्या पालकांनसोबत या विषयावर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत व अशा वेळी ते इंटरनेटच्या सहाय्याने नको ती माहिती घेतात. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक असते. वाढत्या वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक काळजी व ह्या बदलांचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी तसेच आहारात योग्य त्या पोषक घटकांचा समावेश करावा व नियमित व्यायामाची सवय लावावी.

डॉ.राजश्री शेलारे
एम. एस
प्रसूती व स्त्री रोग तज्ञ
सहाय्यक प्राध्यापक
भाऊ साहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
jivankurclinic@gmail.com


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.