दिपाली आत्महत्येनंतर संवादासाठी मंत्री ठाकूर अचानक मेळघाटात

Share This News

अमरावती: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आल्या आहेत. वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतरचा यशोमती ठाकूर यांचा हा पहिलाच दौरा आहे. हा दौरा त्यांनी गोपनीय ठेवला होता. अचानक मेळघाटात येऊन त्यांनी महिला वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. खास करून वरिष्ठांकडून त्रास होत नाही ना, चांगली वागणूक मिळते ना आदी बाबींची त्यांनी विचारपूस केली. मात्र, ठाकूर यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्याने वन विभागातील अधिकारी वर्गाची चांगलीच पळापळ झाली.
मेळघाटातील वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर येथील महिला अधिकारी व कर्मचारी पार खचून गेल्या होत्या त्यामुळे दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर यशोमती ठाकूर यांचा हा दौरा महत्त्वाचा होता.
पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांनी या महिला कर्मचाऱ्यांकडून दिपाली चव्हाण यांच्याबाबतची माहितीही घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकूर यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले होते. विनोद शिवकुमार रुद्र या व्यक्तिच्याच विभागात महिलांना आणि पुरुषांचाही मानसिक छळ होत असल्याचं दिसून आलं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.