२८ जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, ऑनलाईन नोंदणी आवश्यक

Share This News

जम्मू, १६ एप्रिल  : मागील वर्षी कोरोना विषाणूच्या संकटांमुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाच्या वर्षी २८ जूनला सुरू होणारी ही यात्रा रक्षाबंधन, म्हणजेच २२ ऑगस्ट पर्यंतच्या काळात पार पडणार आहे. या अनुषंगाने यात्रेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. सदर यात्रेसाठी भाविक घरबसल्याच नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी त्यांनी http://jksasb.nic.in या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे, असे अमरनाथ श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतिश्वर कुमार यांनी सांगितले.
३० हजार भाविकांची नोंदणी पूर्ण
अमरनाथ श्राइन बोर्डाला यंदाच्या वर्षी यात्रेसाठी सहा लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. जवळपास ५६ दिवस असणारी ही यात्रा यंदाच्या वर्षी दोन्ही मार्गांनी एकाच दिवशी सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी २८ जूनला सुरू होणारी ही यात्रा रक्षाबंधनपर्यंतच्या काळात पार पडणार आहे. पहिल्या १० दिवसांमध्ये जवळपास ३० हजार भाविकांनी यात्रेसाठीची नोंदणी केली आहे.
१३ वर्षांहून कमी, ७५ वर्षांहून जास्त वयाच्या भाविकांना नोंदणी करता येणार नाही
श्राइन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या भाविकांनी आपल्या अर्जासोबत सर्व आवश्यक माहिती तपशील, फोटो आणि सोबत एक वैद्यकिय प्रमाणपत्र जोडणं अपेक्षित असेल. यात्रेसाठी १३ वर्षांहून कमी आणि ७५ वर्षांहून जास्त वय असणाऱ्या भाविकांना नोंदणी करता येणार नाही. यंदाच्या वर्षी यात्रेसाठी सहा लाख भाविक येणार असल्याचा अंदाज घेत प्रशासनानं त्यासाठीची तयारी करण्यास सुरुवातही केली आहे.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे सल्लागार बसीर अहमद खान यांनी गांदरबलचा दौरा करत यात्रेच्या तयारीची पाहणी केली. गांदरबलचे उपजिल्हाधिकारी यांना यात्रेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तयारीमध्ये हातभार लावत आवश्यक कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सदर यात्रेसाठी वीजपुरवठा, पाण्याची सोय, वैद्यकिस सुविधा, कंट्रोल रुम, भाविकांसाठीचे तळ, आपत्ती व्यवस्थापन, अन्नपुरवठा, स्वच्छता या साऱ्याबाबतची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.