विदर्भातील महत्वाचा मोहरा राष्ट्रवादीच्या गळाला
नागपूर | 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात विजयाचा झेंडा रोवला आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झालं. गेल्या काही महिन्यांमध्ये विरोधातील अनेक नेत्यांनी स्वपक्षाला रामराम ठोकत महाविकास आघाडीत प्रवेश केले आहेत.
महाविकास आघाडीमधील सर्वात महत्वाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील गेल्या काही महिन्यांमध्ये अनके नेत्यांनी प्रवेश केले आहेत. अशातच आता विदर्भातील आणखी एक महत्वाचा मोहरा राष्ट्रवादीच्या गळाला लागला असल्याचं बोललं जात आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. सुबोध मोहिते यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे. यामुळे सुबोध मोहिते लवकरंच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील, असं बोललं जात आहे.
विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस ब.ळकट करण्यासाठी सुबोध मोहिते यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल, असं बोललं जात आहे.
सुबोध मोहिते हे अटल बिहारी वाजपेयी सरकरमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राहिले होते. काही दिवसांपूर्वीच मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. मात्र, प्रवेशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा असणाऱ्या राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे मतभे.द झाले आणि त्यांनी पक्षाशी सर्व संबंध तोडले.
मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवर नवीन संघटना स्थापन करण्याची घो.षणा केली होती. मात्र, आता सुबोध मोहिते हे राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील नेत्यांच्या भेटी घेऊ लागल्यानं ते लवकरंच राष्ट्रवादीच्या गो.टात दिसतील, असं बोललं जाऊ लागलं आहे.दरम्यान, अद्याप राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने सुबोध मोहिते यांच्या पक्षप्रवेशावर काहीही भाष्य केलं नाही. सुबोध मोहिते येत्या दिवसांत राष्ट्रवादीत दिसणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.