बोलघेवडा एक जुना लेख

Share This News

मधुसूदन (मदन) पुराणिक

एक जुना लेख-

बोलघेवडा

सुधा मूर्ती याचं लीना सोहनी यांनी अनुवादित केलेलं, ‘आयुष्याचे धडे गिरवताना’या पुस्तकाचा आस्वाद घेत असताना त्यातील चिकटगुंडा ही कथा, त्याचं शिर्षक आणि त्या कथेतील ‘शाब्दिक अतिसार’ हा शब्दप्रयोग खूप भावला. या कथेतील पात्राच्या स्वभाववैशिष्ट्याला उद्घृत करणारं कथेचं शीर्षक आणि त्यातील वरील शब्दप्रयोग अगदी चपखल आहे.

हा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाला आम्ही ‘बडबड्या धांदूल’ म्हणायचो. याचं कारण म्हणजे आमच्या प्राथमिक शिक्षणातील बालभारती मराठी पुस्तकात ह्या नावाची एक कथा होती आणि ती कथा आमच्या अजूनही स्मरणात आहे. ऐरावताच्या पायाला लटकून स्वर्गात निघालेल्या एका अशाच अतिशय बोलणार्‍या व्यक्तीची ही कथा. आपल्या अति बडबड्या स्वभावामुळे किती मोठं, किती मोठं हे हातानं सांगण्याच्या नादात त्याचा हात सुटला आणि त्याचा कपाळमोक्ष झाला. बडबड्या स्वभावानं किती नुकसान झालं हे आम्हाला त्यावेळी या कथेद्वारे आमचे शिक्षक समजावून द्यायचे.

सुधा मूर्तीच्या वरील कथेतून त्या पात्राच्या बडबडण्याचा त्याच सपंर्कात आलेल्या लोकांना कंटाळा येतो. बडबड्या धांदूलाच्या बडबड्या स्वभावामुळे त्याचं स्वत:चं नुकसान होतं. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टीमधून अति बोलण्याचा काय दुष्परिणाम होतो हेच तात्पर्य निघतं.
काही बाबतीत हे तात्पर्य योग्यच आहे. परंतु, मला वैयक्तिकरित्या अशी ही बडबडणारी मंडळी खूप आवडतात. माझ्या मते ही मंडळी आपल्यामध्ये एक बाल्य जपत असतात. त्यांच्यातलं हे लहान मूल त्यांच्या स्वत:सोबत नेहमीच घेऊन ते जगत असतात. ‘कुणी निंदा, कुणी वंदा’ परंतु, ही मंडळी आपल्या या स्वभावविशेषानुसार आपले स्वत:चे स्वभावही नकळतपणे इतरांसमोर सहजतेने उलगडत असतात. त्यांच्या स्वभावाबद्दल आराखडा बांधण्याची किंवा विचार करण्याची वेळ ते इतर कुणावरही येऊ देत नाही. त्यांच्या पोटात कुठलीच गोष्ट टिकत नाही. कुठल्याच गोष्टीचं बद्धकोष्ठ त्यांना सतावित नाही. त्यामुळे काय सांगायचं, काय नाही, काय बोलायचं, काय नाही, या सर्व गोष्टीचं दुखणं वागवत ते बसत नाही. त्याचा विचारही ते कधी करीत नाही.

कुठलीही गोष्ट सांगताना शब्दांची कसरत त्यांना करावीच लागत नाही. त्यांच्या ओठातून बाहेर पडणारं हे पोटाच्या आतूनच आलेलं असतं. त्यामुळे ते कुणालाही आपल्या बोलण्याद्वारे फसवत असण्याची शक्यता कमी असते. त्यांच्या आतलं आणि बाहेरचं व्यक्तिमत्त्व हे एकच असतं. चेहर्‍यावर मुखवटे लावून वावरणार्‍यापेक्षा हे असले लोक म्हणूनच मला आवडतात.

अशा लोकांच्या बडबड्या स्वभावामुळे त्यांच्या आजूबाजूंच्या लोकांची अडचण होते, ते कंटाळतात, त्यांना चिडही येते. परंतु, निदान न बोलता फसविणार्‍या, चिमटे काढणार्‍या, नुकसान करणार्‍या अबोल्यांपेक्षा किंवा मितभाषिकांपेक्षा हे बोलघेवडे नुकसानदायक नसतात हे त्यांना अनुभवल्याशिवाय नाही कळणार.
मी वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या स्वभावातून बालपण जपणारं आणि जगणारं हे व्यक्तिमत्त्व आतून जेव्हा खचतं ना तेव्हा ते आपल्या बडबड्या स्वभावाचा आधार घेताना मात्र त्याचं खरं दु:ख इतरांसमोर कधीच व्यक्त करीत नाही. परंतु, त्यांच्या स्वभावतील हे वेगळेपण कुणाच्याच नजरेत येत नाही. आपल्या दु:खाला एका वेगळय़ा दालनात किंवा आवरणाच्या आत बंद करून त्याच्या समोरच्यांना त्याची हलकीशी झळ लागू न देता बडबडताना त्यांच्या डोळय़ाची ओलसर कडा कुणालाच दिसत नाही. खरं सांगू, म्हणूनच मला ही बोलघेवडी माणसं मनापासून आवडतात.

मधुसूदन (मदन) पुराणिक


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.