अंकिता जळीतकांड प्रकरणी ११ जानेवारीपासून साक्षीपुरावे नोंदविणार
वर्धा
हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयापुढे आरोपी विकेश नगराळे विरोधात पाठलाग आणि हत्येचा दोषारोपण ठेवत खटल्याच्या कामकाजाला गुरुवारपासून खर्या अर्थाने सुरुवात झाली. तसेच नवीन वर्षात ११, १२ व १३ जानेवारीला साक्षपुरावे न्यायालयापुढे नोंदवले जाणार आहेत. या तिन्ही दिवसात विशेष सरकारी वकील उज्जवल निकम स्वत: न्यायालयाच्या कामकाजात उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात विकेश नगराळे याच्यावर ३५४ (डी) कलमान्वये पीडितेची इच्छा नसताना पाठलाग करणे, तसेच तिच्या अंगावर पेट्रोल टाकून ती मृत्यू पावल्याने हत्येचा गुन्हा, असे दोन आरोप वाचून दाखवण्यात आले. गुन्हा कबूल आहे की नाही अशी विचरणा न्यायालयाकडून करण्यात आली. यात आरोपी विकेशने नकार दिल्याने कामकाज चालवत पुढील तारीख देत गुरुवारच्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी सरकारी वकील म्हणून प्रसाद सोईतकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने कामकाज पाहिले, तर आरोपी विकेश नगराळेकडून नागपूर येथील वकील भूपेंद्र सोने यांनी कामकाज पाहिले.