रंजित सफेलकरवर आणखी एक गुन्हा दाखल

Share This News

नागपूर
मौजा वांजरा येथे असलेल्या दुकानावर अवैध कब्जा करून दुकान मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रंजित सफेलकर आणि त्याच्या साथीदारांवर कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रवी राजू डिकोंडवार (३२) यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांनी २९ मार्च २0१६ मध्ये मौजा वांजरा येथे १२00 चौ. फूटचा प्लॉट १४१ हा मजुफ्फर हुसैन शेख वल्द जहुर हुसैन शेख यांच्याकडून विकत घेतला होता. त्या प्लॉटवर ४ दुकानांचे बांधकाम केले होते. रंजित सफेलकर याने त्यांना कामठीतील त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून दुकान ताब्यात देण्याबाबत धमकी दिली. रंजित सफेलकर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे रवी यांना माहीत होते. त्यावेळी तेथे उपस्थित सर्व लोकांनी तेथील वातावरण दहशतीचे केले होते. रवी यांनी सफेलकरला दुकान नाही देऊ शकत, त्या दुकानामुळे त्यांची रोजीरोटी चालते, असे म्हटले असता सफेलकरने त्यांना ‘जिंदा रहना है की नही, अच्छे से समझा रहा हूं तो समज नहीं तो मेरे लडकों को इशारा करूंगा तो यहां से जिंदा वापस नही जायेगा’, असे धमवल्याने रवीने जीवाच्या भीतीपोटी घाबरून २ दुकान देण्याचे कबूल केले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सफेलकर, राकेश काळे, अजय चिन्नौर, चेतन कडू आणि इतर ४ ते ५ इसमांनी येऊन त्यांच्या ताब्यातील २ दुकान ताब्यात घेऊन साफसफाई केली. तेथे ओम साई लॅण्ड डेव्हलपर्स या नावाचा बोर्ड लावला. सफेलकरने ७ महिने झाल्यावरही दुकान खाली केले नसल्याने रवीने दुकानात बसणारे अजय चिन्नौर, राकेश काळे, संजय कारोंडे यांना दुकान खाली करण्याबाबत वारंवार विनंती केली. पण, दुकान खाली करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी रवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रंजित सफेलकर, राकेश काळे, अजय चिन्नौर, संजय कारोंडे आणि त्यांच्या साथीदारांवर कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यत आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.