इंग्लंडहून नागपुरात परतलेला आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर : इंग्लंडहून परतलेला आणखी एक रुग्ण शनिवारी पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले आहे. रुग्णाचे नमुने कोरोनाचा नवा स्ट्रेन तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या मेडिकलमध्ये विदेशातून आलेले चार रुग्ण भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. युरोप, मिडल ईस्ट, साऊथ आफ्रिका येथून २५ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबरपर्यंत नागपुरात परतलेल्या पहिल्या यादीत ३९ नावे होती. यातील पहिल्या रुग्णाचे नमुने रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह तर नंतरच्या आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आले. तरीही त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. विदेशातून आलेल्या दोन महिलांचे आरटीपीसीआर नमुने पॉझिटिव्ह आले. यामुळे या तिघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी याच यादीतील नरेंद्रनगर येथील ३६ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. यामुळे या रुग्णालाही मेडिकलमध्ये दाखल केले आहे. याचेही नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. पहिल्या यादीतील ३५ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. विदेशातून आलेल्या ७० प्रवाशांची दुसरी यादी मनपाच्या दुसऱ्या यादीत विदेशातून आलेल्या ७० प्रवाशांची नावे आहेत. रविवारपासून या यादीतील प्रवाशांची भेट घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. तूर्तास तरी पहिल्या चार नमुन्यांचा अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेतून उपलब्ध झाला नाही.