पंतप्रधानांच्या नावाने ॲप , अडीच लाख लोकांची फसवणूक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या नावाने बोगस ॲप तयार करून देशभरातील अडीच लाख लोकांना फसविणाऱ्यांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून चार जणांना अटक करण्यात आली. फसवणुकीचा आकडा सुमोर पाच कोटींचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सरकारच्या विविध योजनेतून कर्ज देणार असल्याचे सांगत ही टोळी प्रोसेसिंग फी, नोंदणी फीच्या नावाखाली पैसे उकळत होती.
पकडण्यात आलेली टोळी उत्तर प्रदेशातील अलीगडमधून फसवणूक करीत होती. पुण्यातील सूरज सावळे नामक तरुणाला कर्जासाठी दिलेली प्रोसेसिंग फी परत करण्याबाबत वारंवार फोन तसेच धमकीचे संदेश येत होते. सूरजने तक्रार केल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. उपायुक्त रश्मी करंदीकर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शर्मिला सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष मस्तूद, अलका जाधव, सुरवसे, देसाई यांच्या पथकाने संजीवकुमार विरी सिंह, प्रांजल राठोड, रामनिवास कुमावत आणि विवेक शर्मा या चौघांना उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथून अटक केली. फसवणुकीचा प्रकार खरा वाटावा म्हणून त्यांनी राजस्थानच्या जयपूरमध्ये कॉल सेंटरही सुरू केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तसेच राजमुद्रेचा वापर करून त्यांनी ॲप बनविले होते. हे ॲप देशभरात सुमारे २ लाख ७९ हजार ३५२ लोकांनी डाउनलोड केले होते.
पोलिस म्हणतात हे अॅप फसवे
पीएमवायएल, पीएम भारत लोन योजना, प्रधानमंत्री योजना लोन, प्रधानमंत्री लोन योजना, सर्वोत्तम फायनान्स, प्रधानमंत्री मुद्रा लोन, भारत योजना लोन, मुद्रा लोन, कृष्णा लोन हे नऊ अॅप लोकांनी डाउनलोड करू नये, असे पोलिसांनी स्पश्ट केले. याशिवाय www.pradhanmantriloanyojana.com, www.pradhanmantriyojanaloan.com, www.sarvottamfinance.com या तीन वेबसाइटही फेक असल्याचे पोलिसांनी सांगितले.