नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता – अमित देशमुख
मुंबई, : नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यावर्षीपासून प्रारंभ होत असून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. 21 जानेवारी 2012 रोजी नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास परवानगी मिळाली. केंद्राचे 60 टक्के (195 कोटी), राज्य शासनाचे 40 टक्के (130 कोटी) निधी मंजूर झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गात पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री ॲङ पाडवी म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय 41.09 एकर जागेत उभारण्यात येणार असून येणाऱ्या काळात महाविद्यालयाच्या कामाबरोबरच रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले.