नागपूर : सहायक श्रम आयुक्तांना 60 हजारांची लाच घेताना सीबीआय कडून अटक
नागपूर :60 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून नागपूरच्या सीबीआय कार्यालयाने केंद्रीय श्रम विभागातील सहायक श्रम आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यात कुठल्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचा नियम राज्यसरकारने ऑक्टोबर महिन्यात लागू केला होता. या नव्या नियमांनातर सीबीआयची राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. नागपूरच्या विभागीय श्रम आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त पदावर कार्य करणारे अधिकारी सचिन शेलार यांच्याविरुद्ध नागपूरच्या सीबीआय च्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे. तक्रारकर्त्याचा अमरावती जिल्ह्यातिल बडनेरा येथे कारखाना आहे, या कारखान्याला श्रम विभागातर्फे देण्यात येणाऱ्या परवाण्याच्या मोबदल्यात सहायक आयुक्तांनी लाच मागीतल्याची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यावर 29 डिसेंबरला सहायक श्रम आयुक्त सचिन शेलार यांना 60 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी नागपूर सीबीआय च्या अधीक्षक निर्मला देवी यांच्या निर्देशानुसार सचिन शेलार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर नागपूरच्या सीबीआय पथकाने या प्रकरणाच्या तपासाकरिता राज्यसरकरच्या गृह विभागाकडे परवानगी मागितली. गृह विभागतर्फे परवानगी मिळाल्यावर सचिन शेलार यांची चौकशी करण्यात आली.सचिन शेलार यांच्या निववस्थानी व कार्यालयात करण्यात आलेल्या या चौकशी दरम्यान सीबीआय पथकाला काही महत्वपूर्ण दस्तावेज,रोकड व पुरावे प्राप्त झाल्याची माहिती आहे.