सहायक वस्त्रोद्योग आयुक्त एसीबीच्या जाळ्यात
राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्तांना लाचेची मागणी केल्याचा आरोपात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. योगेश बाकरे असे अटक करण्यात आलेल्या सहायक आयुक्तांचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे सुरक्षा रक्षक एजन्सीचे संचालक आहेत. एजन्सीच्या थकीत बिलाच्या मंजुरीसाठी सहायक आयुक्त योगेश बाकरे यांनी ३ लाख रुपयांचा लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ज्यानंतर एसीबीने योगेश बाकरे यांना अटक केली. अटक केल्यावर न्यायालयात हजर करून २७ जानेवारीपर्यंत न्यायालयाने बाकरे यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर,अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भावना धुमाळे यांनी पार पाडली.