लॉकडाउन धुडकावत अमरावतीत दुकाने उघडण्याचा प्रयत्न Attempt to open shops in Amravati despite the lockdown

Share This News

अमरावती : गेल्या अनेक दिवसांच्या लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेत दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत संपूर्ण बाजारपेठ बंद करविली. त्यानंतर दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बिझिलॅण्ड या कापड बाजारपेठेत हा प्रकार घडला. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाउनमुळे बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. अशात आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने अमरावती महसूल विभागातील अमरावती शहर, अचलपूर, अंजनगावसुर्जी, अकोला, बुलडाणा येथे लॉकडाउन करण्यात आले आहेत. या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी लॉकडाउनचे आदेश धुडकावित बाजारपेठ सुरू केली. याप्रकाराची माहिती मिळताच अमरावती शहर पोलिसांना ताफा बिझिलॅण्ड परिसरात दाखल झाला. लग्न सराई असल्याने सुरक्षित वावरासह दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलिसांना केली. मात्र पोलिस व प्रशासकीय अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी काही व्यापाऱ्यांचा पोलिसांशी वादही झाला. त्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवित बाजारपेठ बंद केली. त्यानंतर लॉकडाउन आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

स्थानिक नेत्यांचा विरोध
अमरावतीत लॉकडाउन करताना शासनाने गरीब, श्रमिक आदी कुणाच्याचा रोजीरोटीचा विचार केला नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनीही या कडक लॉकडाउनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सुलभा खोडके यांनी सरकारने लॉकडाउनचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी तर विधानसभेतच सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.