‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न केला जातोय-संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Share This News

मुंबई- पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. तसेच विरोधकांकडून राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही केली जात आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे’ असे राऊत म्हणाले.

सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त करायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले. आम्ही यापुढे विरोधकांच्या आरोपांना उत्तरही देणार नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सर्वच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर केला तरी महाविकासआघाडी सरकारला धक्का लागणार नाही.’ असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का?
संजय राऊतांना गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा तपास योग्य पध्दतीने होईल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ‘जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे तसेच कोणत्याही दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच्या बेछुट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही. प्रतिमेला कोणताही तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलेय की विरोधाचे राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचे. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का?’ असा सवाल राऊतांनी केला आहे.

कितीही तपास केला तरी आमचे सरकार पडणार नाही
केंद्रीय यंत्रणांमार्फत केल्या जाणाऱ्या तपासावरुन टीका करताना राऊत म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? तसेच पुढे ते म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला याचा फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे. आमचे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल असा इशाराही राऊतांनी दिला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.