पहिल्या दिवशी केवळ २२.५ टक्के विद्यार्थ्यांचीच उपस्थिती
नागपूर |
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर व जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर बुधवार, २७ जानेवारी रोजी प्रथमच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग असलेल्या १७८८ शाळांची घंटा वाजली खरी. मात्र, पहिल्याच दिवशी केवळ २२.५ टक्के म्हणजेच ३३ हजार ९१६ विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली. तर १.१५ लाखावर विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ दाखविल्याची अर्थात पालक अद्यापही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे दिसून आले. यावरून अद्यापही शाळा सुरू करण्याचा निर्णय हा पालकांच्या पचनी पडला नसल्याचे यावरून दिसून येत आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या दहा महिन्यांपासून जिल्ह्यात शाळा बंद आहेत. मात्र रुग्ण संख्या ओसरत असल्याने पुन्हा एकदा सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. गत महिन्यात १४ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ ते १२ चे वर्ग सुरू करण्यात आलेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती व सर्व आलबेल असल्याने शासनाने ५ ते ८ चे वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या इयत्ता ५ ते ८ च्या शाळा आजपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश होते. त्यानुसार शिक्षण विभागाने संपूर्ण तयारीदेखील करून घेतली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सदर इयत्तेच्या १७८८ वर शाळा असून, येथे एकूण १ लाख ५0 हजार ७१७ विद्यार्थी शिक्षण घेतात. तर १0 हजार ६२७ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु आज पहिल्या दिवशी एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ २२.५ टक्के म्हणजेच ३३ हजार ९१६ विद्यार्थीच उपस्थित राहिलेत. तर १ लाख १६ हजार ८0१ विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत. तर एकूण शिक्षकांपैकी ५८५४ शिक्षकच पहिल्या दिवशी शाळेमध्ये उपस्थित होते. शाळेमध्ये येण्यासाठी पालकांची संमती गरजेची आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र देखील भरून घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाखावर पालकांनी आपल्या शाळेत पाठविण्यास संमती दर्शविली नसल्याचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर शाळा सुरू असताना जि.प.च्या शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यातच आल्या होत्या. सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या नागपूर तालुक्यातील २९२ शाळांमध्ये केवळ २३८0 म्हणजेच ८.0५ टक्के विद्यार्थी उपस्थित राहिलेत. जेव्हाकी २७१८४ विद्यार्थी शाळेतच आले नाहीत. ६५ शिक्षक पॉझिटिव्ह कोरोनाचा प्रकोप अद्यापही कायम आहे. त्यामुळे शासनाने इयत्ता ५ ते ८ चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात ९ ते १२ वीनंतर या माध्यमांच्या शाळाही सुरू झाल्यात. परंतु शाळेमध्ये सुरुवातीचे काही दिवस केवळ गणित, विज्ञान व इंग्रजी या तीनच विषयांचे अध्यापन होणार असल्याची माहिती आहे. शाळेमध्ये गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक वर्गाला अध्र्या तासाच्या फरकाने भरविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कोरोनाची बाधा झाली असल्याने ६५ शिक्षकांना शाळेमध्ये येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. |