केंद्रीय अधिकाऱ्यांना पुरस्कार Awards toofficers
नवी दिल्ली, 27 जानेवारी केंद्र सरकारच्या सेवेत असताना संबंधित क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षे असामान्य आणि निर्दोष सेवा बजावल्याबद्दल या वर्षी 2 अधिकाऱ्यांची “जीव धोक्यात घालून केलेल्या असामान्य गुणवत्तापूर्ण सेवे”साठीच्या राष्ट्रपती कौतुक प्रमाणपत्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आहे आणि 22 अधिकाऱ्यांची “विशेष उल्लेखनीय सेवा” बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे. या वर्षी निवड झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे त्या त्या विभागात सातत्याने कार्यरत राहून विविध क्षेत्रांमध्ये वचनबद्ध सेवा देणारे अतिरिक्त महासंचालक, सहाय्यक संचालक, अधिक्षक/वरिष्ठ गुप्तचर अधिकारी गुप्तचर अधिकारी, वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक आणि वाहनचालक यांचा समावेश आहे.
दर वर्षी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभागातील अधिकारी आणि क्षेत्र अधिकाऱ्यांनी देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना सातत्याने उच्च दर्जाची सेवा दिल्याबद्दल “जीव धोक्यात घालून केलेल्या असामान्य गुणवत्तापूर्ण सेवे”साठीचा राष्ट्रपती कौतुक प्रमाणपत्र पुरस्कार आणि “विशेष उल्लेखनीय सेवा” बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदके दिली जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सर्व पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
“जीव धोक्यात घालून केलेल्या असामान्य गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या राष्ट्रपती कौतुक प्रमाणपत्र पुरस्कारासाठी निवड झालेल्या 2 अधिकाऱ्यांमध्ये जोधपुर येथे दिल्ली प्रदेश विभागात कार्यरत महसूल गुप्तचर महासंचालनालयाचे गुप्तचर अधिकारी विपिन पाल आणि कोचीन प्रदेश विभागात कार्यरत महसूल गुप्तचर महासंचालनालयाचे गुप्तचर अधिकारी अल्बर्ट जॉर्ज यांचा समावेश आहे.
“विशेष उल्लेखनीय सेवा” बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेल्या 22 अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई झोनल विभागात कार्यरत महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीआरआय) सुहृद अविनाश राबडे आणि रमाकांत यशवंत मोरे या 2 गुप्तचर अधिकाऱ्यांचा तसेच पुण्याच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अधीक्षक अनिता जाधव आणि पुणे झोनल विभागात वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयात (डीजीजीआय), गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अजित सुरेश लिमये यांचा समावेश आहे.