८३ व्या जयंतीनिमित्त साकारली अप्रतिम कलाकृती

Share This News

जळगाव, १४ डिसेंबर (हिं.स.) : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८३ व्या जयंतीच्या औचित्याने जैन पाईपचा उपयोग करून अनुभूती निवासी स्कूलच्या फूटबॉल ग्राऊंडवर १०५ फूट लांब व ७५ फूट रुंद असे सुमारे ८ हजार चौरस फुटची विस्तृत मोझाईक आर्टमधील कलाकृती साकारली.भवरलालजी जैन यांचे हे पोट्रेट अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या १५ सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन दिवसात साकारली.
ही कलाकृती साकारण्यासाठी काळ्या, करड्या, पांढऱ्या रंगांच्या प्लास्टिक पाईपचा उपयोग केला गेला. जवळून ही कलाकृती फक्त पाईपांची मांडणी वाटते परंतु उंचावरून अथवा ड्रोनने ही कलाकृती अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसते. ही कलाकृती पाहण्यासाठी अनुभूती स्कूल परिसरातील सर्वात उंच टेकडीवर महावीर पॉईंट येथून या मोठ्या कलाकृतीचा आनंद घेता येतो.
श्रद्धेय मोठ्या भाऊंकडून मिळाली प्रेरणा – प्रदीप भोसले
जैन इरिगेशनच्या सोलर आर अण्ड डी विभागातील व्यवस्थापक प्रदीप भोसले कलाकार देखील आहेत. ‘मोठी स्वप्ने बघा, म्हणजे आपल्या हातून मोठे काम होते,’  श्रद्धेय भाऊंच्या एका सुविचाराने त्यांना जगातील सर्वात मोठी कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाली. रेषा, बिंदू, रंगसंगती हे चित्रकलेचे तंत्र वापरून सर्वात मोठे मोझाईक आर्टमधील पोट्रेट साकार करण्याचे विचार भोसले यांनी बोलून दाखविले. कुठल्याही चांगल्या घडणाऱ्या गोष्टीला जैन परिवाराचे नेहमीच प्रोत्साहन असते. त्यामुळेच अशोक जैन यांना संकल्पना आवडली व ती साकारण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत केली. प्रशांत भारती, प्रकाश पाटील, अनिल पाटील, अजय काळे, सारंग जेऊरकर आणि संतोष पांडे यासह इतर १५ सहकाऱ्यांच्या मदतीने अथक परिश्रम करत मोठी कलाकृती साकारली.
आठवडाभर बघता येणार भली मोठी कलाकृती
ही  मोठी कलाकृती या आठवड्यात त्याच परिसरातील महावीर पॉईंट येथून सकाळी ९ ते ५ या दरम्यान पाहता येणार आहे. भविष्यात ही कलाकृती स्थापित करण्याचे नियोजन आहे असे अशोक जैन यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.