‘आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासियांच्या मनांना जोडणारा उपक्रम – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ‘Azadi Ka Amrit Mahotsav’ is an initiative that connects the minds of the people – Governor Bhagat Singh Koshyari

Share This News

मुंबई, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजरा होत असलेला ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासियांच्या मनांना जोडणारा उपक्रम आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजरा होत असलेल्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देशभरातील अनेक महापुरूषांनी बलिदान दिले आहे. यात स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील महापुरूषांचेही योगदान आहे. देशाचा इतिहास आणि महापुरूषांच्या बलिदानाचे स्मरण करून आदर्श भारत आणि महाराष्ट्र निर्माण करूया. जगभरातील देशात नाहीत तेवढे किल्ले महाराष्ट्रात आहेत. हा ऐतिहासिक ठेवा असून त्याचे सर्वांना स्मरण असले पाहिजे. युवा पिढीने याचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात साजरा होणारा ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात महाराष्ट्राला अव्वल आणू, यातील उपक्रम महाराष्ट्रात दिमाखाने साजरे होतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या कालावधीत महाराष्ट्राचीही जडणघडण झाली. स्वातंत्र्य लढ्यात आहुती देणाऱ्या महापुरुषांचा या उपक्रमातून गौरव होत आहे ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राला महापुरुषांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. त्यांचे स्मरण करुन गौरव केला जात आहे. अशा उपक्रम कार्यक्रमांसाठी निधीची कमतरता येणार नाही, अशी ग्वाही श्री.देशमुख यांनी यावेळी दिली. ‘आजादी अमृत महोत्सव’ हा उपक्रम साजरा करताना कोरोना महामारीसंबंधी मार्गदर्शक सूचनांची काळजी घेण्याचे आवाहनही श्री.देशमुख यांनी केले.

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरव विजय, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.

प्रास्ताविकात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री.विजय यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित “आजादी का अमृत महोत्सव” या राष्ट्रीय उपक्रमाचे महत्त्व, पार्श्वभूमी आणि वर्षभरात महाराष्ट्रात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आभार मानले.

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा सांस्कृतिक कार्यक्रम खबरदारीपूर्वक झाला. यावेळी गीतगायन आणि नृत्य सादरीकरण झाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.