बावनकुळेंनी हसे करून घेऊ नये : गृहमंत्री |Bawankule should not laugh: Home Minister

Share This News

नागपूर : वीज खंडित होण्याचा विषय हा पूर्णपणे तांत्रिक आहे. त्यामुळे माजी ऊर्जामंत्री असूनही चंद्रशेखर बावनकुळे यांना तो कळणार नाही. त्यामुळे नको त्या विषयात बोलून त्यांनी आपले हसे करून घेऊ नये, असा पलटवार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
भाजपचे नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सायबर हल्ल्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनविल्याचा आरोप केला. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीरपणे ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले. ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील वीज पुरवठा ठप्प पडल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या सायबर सेलने अहवाल दिल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. सायबर सेलच्या अहवालानुसार चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाला होता, तर मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चारपैकी दोन लाइनवर जास्त दबाव आल्याने वीज बंद पडल्याचे बावनकुळे यांचे म्हणणे आहे. मुंबईतील वीज पुरवठा बंद पडण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आता त्यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आले आहेत. त्यांनी एकमेकांवर टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा खंडीत होण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा ‘पॉवर गेम’ आता कसा रंगतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.