आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच तिने सोडले प्राण, वर्धेतील दुदैवी घटना

Share This News

वर्धा : कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळाल्याने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच तिचा मृत्यू झाला. मन अतिशय सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळण्याइतपत आरोग्य यंत्रणा कोलडली आहे. यापेक्षा आणखी भयानक परिस्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आज (25 एप्रिल) एका महिलेला उपचारासाठी आणले होते. त्या महिलेला कंबरेचे दुखणे असल्याने त्यांना रुग्णालयात आणले होते. दरम्यान, रुग्ण कोविड पॉझिटीव्ह असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबिय तिला आयसोलेशन कक्षाकडे नेत होते. महिलेला दमाचादेखील त्रास होता. रुग्णाला व्हिलचेअर, स्ट्रेचर उपलब्ध करणे गरजेचे होते. पण, ही सुविधा न मिळाल्याने रुग्णाला पायीच आयसोलेशन कक्षाकडे नेले जात होते.
श्वास घेण्यास अडथळा येत असल्याने महिला रुग्णाने आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच प्राण सोडले. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णांकरीता साधी व्हिलचेअरदेखील या रुग्णालयात उपलब्ध नाही? असा प्रश्न रुग्णाच्या नातलगांकडून उपस्थित करण्यात आला. रुग्णांच्या नातेवाईकांचं आक्रोश करत रडणं या भयानक वस्तुस्थितीची गडदपणे जाणीव करुन देतेय. या महिला रुग्णाच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.