भंडारा : गोडावून अभावी हजारो क्विंटल धान वाऱ्यावर

Share This News

शेतकर्‍यांची धान खरेदीसाठी ओरड वाढताच प्रशासनाने खरेदी केंद्र सुरू करून बाहेर धानाचा काटा केला जाईल व शेतकर्‍याना त्रास होणार नाही, असे आश्‍वासन दिले. परंतु, गोडावूनच नसल्याने खरेदी प्रक्रिया बंद पडली आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गोडावूनची व्यवस्था करून देण्याची गरज आहे. याशिवाय राजकीय पुढार्‍यांनीही गोडावूनची क्षमता वाढविण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासनही हवेत विरले.लोकशाही वार्ता/भंडारा
धानाची कापणी व मळणी झाल्यानंतर शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर धान आणून ठेवले आहेत. परंतु, पुरेशा प्रमाणात गोडावून नसल्याने हजारो क्विंटल धान्य केंद्रावर पडून आहेत. अजुनही धानाचा काटा (मोजणी) सुरू झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. धानाची मोजणी झालेली नसल्याने दैनंदिन खर्च, मुला-मुलींचे लग्न व अन्य खर्चासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील वर्षी शेतकर्‍यांना धानाचा काटा (मोजणी) करण्याकरीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नव्हती. धानाचा काटा होवून शेतकर्‍यांना धानाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळाले होते. परंतु, यावर्षी शासनाच्या विविध अटी व शर्तीमुळे धान खरेदी केंद्र अडचणीत सापडले. शासनाच्या निर्देशानुसार धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीकरीता डिजिटल सातबाराची अट समोर केली. अनेक शेतकर्‍यांना वेळेत डिजीटल सातबारा तयार मिळाला नाही. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू होवूनही १५ दिवस बंद राहीले. धानाचा काटाही करण्यात आलेला नव्हता.
शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. डिजिटल सातबारा अट रद्द करून तलाठी सातबारावर धान खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर शासन-प्रशासनाने तलाठी सातबारावर जुन्याच पद्धतीने धान खरेदी करण्यास परवानगी दिल्याने धान खरेदी सुरू करण्यात आली. परंतु, ग्रामीण भागात उपलब्ध गोडावूनची क्षमता अत्यंत तोकडी असल्याने अल्पावधित गोडावून पूर्ण भरले. त्यामुळे पुन्हा धानाचे काटे बंद करण्यात आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.