भंडारा : राज्यातील बारमाही वनमजूर बिना वेतन

Share This News

भंडारा
वनाचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी सांभाळणार्‍या राज्यभरातील बारमाही वनमजुरांवर उपासमारीची संकट बळावले आहे. गत आठ महिन्यांपासून या वन मजुरांना वेतन मिळालेले नाही. यासंदर्भात या मजुरांना त्वरित वेतन न दिल्यास राज्यस्तरावर तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजूर कामगार संघटनेने दिला आहे.
राज्यातील वनविभाग, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभागांतर्गत गत दोन दशकांपासून जवळपास चार हजार बारमाही वनमजुर नियमितपणे सेवा देत आहेत. वनसंरक्षणाचे काम ते इमानेइतबारे पाहत आहेत. संबंधित विभागाकडून नियमित वेतनही मिळत होते. परंतु मे २0२0पासून त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालेले नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा असा प्रश्न या मजुरांसमोर उभा ठाकला आहे. यासंदर्भात या मजुरांना वेतन द्यावे अशी मागणी केली, मात्र त्यांच्या या रास्त मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन या बारमाही वनमजुरांना थकीत वेतन द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नागझिरा वन्यजीव अभयारण्यात वेगवेगळ्या संरक्षण कुटीवर काही वनमजूर कार्यरत असून ते बिटरक्षकांसोबत पायी फिरून वनाचे संरक्षण करतात. वेळप्रसंगी संरक्षण कुटीवर मुक्काम करुन कर्तव्य पार पाडतात. परंतु, त्यांना आठ महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे.
येत्या दहा दिवसात वेतन न मिळाल्यास वन्यजीव अभयारण्यातील प्रवेशद्वारासमोर उपोषणावर बसण्याचा इशारा वनमजुरांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.