भंडारा : आंतरराज्यीय सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरायातून निगराणी

Share This News

बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील चौकीत पोलिस नियुक्त करण्यात येत आहेत. याच पोलिसांना तपास कार्याकरिता बिटमध्ये जावे लागत आहे. यामुळे सीमेवरून येणारी जाणारी वाहने नजरेतून सुटणार नाहीत. याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिस चौकीत अन्य सुविधा लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत.
– नारायण तुरकुंडे, पोलिस निरीक्षक
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून निगराणी सुरु केली आहे. पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी धाडसी निर्णय घेतल्याने नागरीकांनी कौतुक केले आहे. तुमसर- बपेरा राज्य मार्गावर वाहने उभी केल्यास निश्‍चितच कारवाई करणार असल्याची माहिती सिहोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी दिली आहे.
क्षेत्रफळाने विस्तारीत सिहोरा पोलिस ठाण्यात पोलिसांची पदे रिक्त आहेत. ५३ पोलिसांची पदे असून कार्यरत पोलिस २५ आहेत. कार्यरत पोलिसांची संख्या अध्र्यावर आली आहे. यामुळे पोलिसांवर कामाचा व्याप वाढत आहे. या परिसरात ४ बिट तयार करण्यात आले आहेत. एका बिटमध्ये ८ ते १0 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांना अनेक गावांची जबाबदारी सांभाळताना दमछाक होत आहे. पोलिसांचे रिक्त पदे भरण्याची मागणी सातत्याने होत आहे.
पोलिस चौकी मध्यप्रदेश राज्याचे हाकेच्या अंतरावर आहे. नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्याचे सीमेलगत असून गोंदिया जिल्ह्यातील सीमा या चौकीच्या शेजारी आहेत. वैनगंगा, बावनथडी नद्यांचे त्रिकोणी टोकावर पोलिस चौकी स्थापन करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून अनेक साहित्यांची आयात-निर्यात या सिमेवरून राज्याचे उपराजधानी नागपुरात केली जात आहे. या शिवाय चोरीच्या घटनेतील आरोपी व चोरटे नजिकच्या मध्यप्रदेशात पळून जात आहेत. यामुळे त्यांचा सुगावा लागत नाही. पोलिसांचे पदे रिक्त असल्याने आंतरराज्यीय सीमेवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून निगराणी ठेवण्याची ओरड नागरीक करीत होते. याच मागणीला अनुसरून पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी बपेरा आंतर राज्यीय सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे मध्यप्रदेशात येणार्‍या-जाणार्‍या वाहनावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. वाहनांवर नियंत्रण, घटनेतील तपास, सीमेवर निगराणी अन्य कामकाजाकरीता सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना मदतीचे ठरणार आहेत. याशिवाय चौकीलगत गतिरोधक तयार करण्यात येणार आहेत. पोलिस चौकी समोरून भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, तुमसर बपेरा राज्य मार्गावर असणार्‍या मोठय़ा संख्येच्या गावात व्यावसायिकांचे दुकानाचे समोर थेट राज्य मार्गावर वाहने उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांची वर्दळ वाढल्याने समयसूचकता दाखवत राज्य मार्गावर वाहने उभे करणार्‍या वाहन चालकाचे विरोधात निश्‍चितच पोलिस कारवाई करणार आहेत. राज्य मार्गावरुन सुरक्षित प्रवास करण्यासाठी नागरिकांचे सहकार्याची अपेक्षा पोलिस करीत आहेत. दरम्यान याच परिसरात असणार्‍या सोंड्याटोला धरण मार्गावर हीच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.