भंडारा : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा केव्हा?
भंडारा-: ज्येष्ठ विचारवंत लेखक व सुप्रसिद्ध कम्युनिस्ट पुढारी एडवोकेट कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा धर्मांध फॅसिस्ट व सनातनी विचारांच्या लोकांनी 20 फेब्रुवारी 2015 रोजी खून केला. परंतु त्यांचे मारेकरी आणि सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. त्यांचा योग्य शोध घेतला जात नाही. तेव्हा त्यांना शिक्षा केव्हा होणार असा सवाल करून शासन प्रशासनाने काॅ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे भाकपचे जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाकप कार्यालय राणा भवन भंडारा येथे दिनांक 20 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा 6 वा स्मृतिदिन समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या समारंभाचे अध्यक्षस्थान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे अध्यक्ष रतन मंत्री यांनी भूषविले तर भाकपचे जिल्हा सचिव काॅ.हिवराज उके व किसान सभेचे अध्यक्ष सदानंद इलमे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. महाराष्ट्र हा फुले, शाहू ,आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला नाही तो आपणास घडवायचा आहे त्यासाठी सर्व शोषणाचा, सर्व प्रकारच्या विषमतेचा व अंधश्रद्धेचा शेवट हेच परिवर्तन आहे. भांडवली शासन कोणत्याही रंगाचे असले तरी ते परिवर्तनाच्या विरोधात असते म्हणून कळवा संघर्ष हेच आपले आजचे कार्य आहे असे कॉम्रेड पानसरे म्हणाले होते असे काॅ.हिवराज उके यांनी सांगितले.
कॉम्रेड पानसरे यांचे विचार व कार्य आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात असे कॉम्रेड सदानंद इलमे म्हणाले. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी कॉम्रेड पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. समारंभाचे अध्यक्ष रतन मंत्री यांनी समारोप केला. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उप विभागीय अधिकारी कुमारी मीनल करणवाल यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी काॅ.हिवराज उके, सदानंद इलमे, वामनराव चांदेवार, रतन मंत्री, सुभाष लिमजे ,श्रीराम धुर्वे ,अनिल खरवडे, ज्ञानेश्वर धुर्वे ,राधेश्याम राऊत, मनोज भजे ,राकेश बल्लमवार, विजय वैद्य ,दीपक शहारे ,गजानन पाचे ,घनश्याम नागोसे इत्यादींचा समावेश होता.