‘चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत पदत्याग करा’, संजय राठोडांच्या स्पष्टीकरणानंतरही भाजप | BJP insists on resignation of Forest Minister Sanjay Rathod

Share This News

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि  वनमंत्री संजय राठोड आज अखेर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपली बाजू मांडली आहे. पूजाच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्या प्रकरणावरुन गेल्या 10 दिवसांत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करतानाच कृपया बदनामी करु नका, असं आवाहन राठोड यांनी केलं आहे. राठोड यांच्या स्पष्टीकरणानंतरही भाजप आपल्या मागणीवर ठाम आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत राठोड यांनी पदाचा त्याग करावा आणि निष्पक्ष चौकशीला सामोरं जावं, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.

‘मुख्यमंत्री दबावाला बळी पडत आहेत का?’

संबंधित मंत्री आणि सरकारचं वागणं संशयास्पद आहे. 15 दिवस समाजाच्या नागरिकांना हाताशी धरुन दबाव तंत्र अवलंबलं जात आहे. त्यामुळे हे अनाकलनीय आणि घृणास्पद आहे. दोषारोप सिद्ध होईपर्यंत राठोड यांनी राजीनामा देणं अपेक्षित असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. त्याचबरोबर संजय राठोड यांच्याकडून प्रसार माध्यमांनाच दोष देण्याचा प्रयत्न झाला. वाटलं होतं की ते आज प्रायश्चित घेतील. राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला या प्रकरणातून सोडवू शकते, हे माहिती असल्यानं त्यांनी राजीनामा दिला नाही. सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न राठोड यांच्याकडून होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहेत का? असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचं दरेकर म्हणालेत. त्याचबरोबर राज्यातील महिला आणि मुलींच्या मनात या विषयी काय यातना होत असतील याची जाणीव सरकारला व्हायला हवी. राज्यातील जनतेच्या मनातील प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं, अशी मागणी करतानाच सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी केलाय.

संबंधित मंत्री व सरकारचं वागणं संशयास्पद असून १५ दिवस समाजाच्या नागरिकांना हाताशी धरून दबाव तंत्र अवलंबल असं चित्र आहे. त्यामुळे हे सर्व अनाकलनीय व घृणास्पद असून दोषारोप सिद्ध होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे

देशाच्या उच्च परंपरेचं पालन करा- मुनगंटीवार

कोणत्याही चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत संबंधित मंत्र्याने आपल्या पदाचा त्याग केला पाहिजे, जी या देशाची उच्च परंपरा आहे. कारण, एखादा पीआय किंवा एपीआय चौकशी करत असतो तो लहान असतो. त्याच्यावर मंत्र्याचा दबाव येऊ शकतो. त्यामुळे अशा आरोपावेळी मंत्र्यांनी पायउतार व्हायला हवं. लाल कृष्ष अडवाणी हवाला प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संसदेची पायरी चढले नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत संकेत पाळला आहे. त्यांनी या उच्च परंपरेचं पालन केलं आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात राठोड काय म्हणाले?

जवळपास 15 दिवसानंतर संजय राठोड आज माध्यमांसमोर आले. पोहोरादेवीगडावर सर्व समाध्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे एवढीच चालली. पण पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी पुजा चव्हाणचं नाव घेऊन केली. ते म्हणाले, पुजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील तरुणी होती आणि तिचा पुण्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचं आमच्या गोर बंजारा समाजाला अत्यंत दु;ख झालं आहे. चव्हाण कुटुंबाच्या दु:खात मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे. यानंतर मात्र त्यांनी पुजाचं पुढे कुठेही नाव घेतलं नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.