भाजपकडून आज वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात आले

Share This News

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलावरून चांगलंच राजकारण रंगलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून, ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे. )

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप चंद्रशेखर वाबनकुळेंनी केला. लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी आज नागपूर जिल्ह्यात भाजपनं आंदोलन केलं. महावितरणने पाठवलेल्या वीजबिलाची यावेळी होळी करण्यात आली. कामठी मतदारसंघातील महादुला परिसरात वीजबिलाची ही होळी करण्यात आली, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. ‘राज्य सरकारने आठ दिवसांत थकीत वीजबिलाची चौकशी करावी, शेतकऱ्यांकडे थकीत असलेलं वीजबिल काही भ्रष्टाचार नाही, पण वीजबिल माफी करावी,’ अशी मागणी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन विरोध करणार- बावनकुळे
कोट्यवधी जनता वाढीव वीजबिलामुळे भरडलेली आहे. या सरकारनं वीजबिल माफ केलं नाही, म्हणून आम्ही वीजबिलांची होळी केली. महाराष्ट्रात 2 हजार ठिकाणी वीजबिलांची होळी होणार आहे. तरीही सरकार ऐकलं नाही आणि कोणी वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्यांना विरोध करतील, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा नागरिकांना या आंदोलनात सहभाग होण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आज (23 नोव्हेंबर) भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.