१२९ पैकी ७३ जागी भाजपचा सरपंच,भाजपने गावनिहाय आकडेवारी द्यावी, महाविकास आघाडीचे भाजपला आव्हान
सरपंच पदाच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील १२९ पैकी भारतीय जनता पक्षाला तब्बल ७३ जागी विजय मिळाल्याचा दावा भाजप तर्फे करण्यात आला आहे तर भाजप तर्फे करण्यात आलेला दावा पूर्णतः खोटा असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. महाविकास आघाडीचे ८० पेक्षा जास्त जागी सरपंच निवडून आल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.
निवडणूक झालेल्या १२९ ग्राम पंचायतींपैकी ७३ ग्राम पंचायतींच्या सरपंच पदावर भाजप विजयी झाल्याचा दावा राज्याचे भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. निवडणुकी दरम्यान भाजपचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.सोबतच जिल्ह्यात गेल्या १३ महिन्यांपासून एकही नवे विकासकार्य न केल्याने जनतेने महाविकास आघाडी सरकारला निवडणुकीच्या माध्यमातून नाकारल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. शिवाय भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचे उदघाटन हे सरकार करीत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.
तर सरपंचपदी भाजप उमेदवारांच्या विजयावर काँग्रेस व राष्ट्रवादी ने प्रश्न उपस्थित करीत प्रत्येक गावनिहाय आकडेवारी देण्याचे आव्हान केले आहे. भाजपतर्फे चुकीची माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
जानेवारी महिन्यात निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील १२९ ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली. यामुळे गावागावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर १३ ही तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात पाच गावात नव्या आरक्षणानुसार निवडणून आलेला एकही सदस्य नसल्याने सरपंच पदाचा पेच निर्माण झाला आहे. यात रामटेक तालुक्यातील दाहोडा,सावनेर तालुक्यातील नांदोर,जैतपूर,आणि सोनपूर तर कळमेश्वर तालुक्यातील सावंगी तोमर या ग्राम पंचायतीचा समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने १०२ तर भाजपने ७३ ग्राम पंचायतींवर दावा केला होता. नव्या आरक्षण सोडतीनुसार ज्या गावात सरपंच पदासाठी उमेदवार नसेल तिथे उपसरपंचाकडे सरपंच पदाचा प्रभार सोपवण्यात येणार आहे.