भाजपचे नागपुरातील संमेलन रद्द
नागपूर : कोरोनाची स्थिती बिकट झाल्याने नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नागपूर भाजपने स्वतः हून मंगळवार, २३ फेब्रुवारीला आयेाजित संमेलन रद्द केलाच्या निर्णय घेत सामाजिक जाणीवेचा परिचय करून दिला आहे.
नागपूर भाजपच्यावतीने मंगळवार, २३ फेब्रुवारीला सुरेश भट सभागृहात महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सामाजिक भान राखत आयोजन तूर्तास स्थगित केल्याची माहिती शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिली. महिला मोर्चाच्या अध्यक्ष नीता ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने सातत्याने नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भाजपने संमेलन स्वतः हून रद्द केले आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना आम्ही लोकांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही, असे दटके व ठाकरे यांनी यानिमित्ताने सांगितले. कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होत आहे. त्यापासून नागपूरकरांना वाचविण्यासाठी महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी पूर्ण ताकदीनिशी काम करतील. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची मदत करण्यासाठी महापौर, उपमहापौरांसह सर्वच झोनचे सभापती कामाला लागणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले. ‘कोरोनामुक्त नागपूर’ हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे नागपूर भाजप शहराला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रत्येक आघाडीवर काम करीत होती, आजही करीत आहे व भविष्यातही करेल, असे सांगण्यात आले.