पाकिस्तानातील पेशावर मदरशात स्फोट ;7 ठार 70 पेक्षा अधिक जखमी
Blast at a madrassa in Peshawar, Pakistan; 7 killed, more than 70 injured
पाकिस्तान : पाकिस्तानातील पेशावर येथील एका मदरशामध्ये झालेल्या स्फोटात किमान सात जण दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
हल्ला पाकिस्तानमधल्या खैबर-पख्तुनवा प्रांतातल्या दिर कॉलनीतली स्पिन जमात मशीद आणि मदरशामध्ये झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट झाला तेव्हा सकाळी आठ वाजता मदरशामध्ये अभ्यास सुरू होता. या स्फोटात लहान मुलं ठार झाले असण्याची शक्यता आहे, असं रॉयटर्सला एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नाही. “कुणीतरी मदरशामध्ये एक बॅग नेली आणि तिथेच ठेवली असा अंदाज आहे,” अशी माहिती पोलीस अधिकारी वकार अझीम यांनी एएफपीला दिली आहे
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. “पेशावरमधील मदरशावर झालेल्या हल्ल्याने मला तीव्र दुःख झालं आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रति मी सद्भावना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या भ्याड, पाशवी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा योग्य तो न्यायनिवाडा करू याची मी देशाला हमी देतो”, असं इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटलं.