निर्लज्जम् सदा सुखी😊

Share This News

ऐका दाजिबा😢
…………………
विनोद देशमुख

महाराष्ट्रात सध्या एकाच वेळी दोन कहर सुरू आहेत ! एका बाजूला कोरोनाचा आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या समर्थनाचा. कोरोना तर व्हायरसमुळे अन् माणसाच्या हलगर्जीपणामुळे वाढत आहे. पण भ्रष्टाचार फक्त माणसामुळेच “बहरत” आहे आणि त्याची “गोड” फळे अनेक लोक चाखत आहेत अन् त्याचे समर्थनही करताना दिसताहेत.
एपीआयसारख्या सर्वात खालच्या पोलिस अधिकाऱ्याला दरमहा शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देण्याचा आरोप असणारे राज्याचे ग्रुहमंत्री अनिल देशमुख यांना पाठीशी घालताना शरद पवार काय म्हणाले पाहा. आरोप गंभीर नक्कीच आहे. पण, हे शंभर कोटी कसे दिले, पैसे कुठे गेले याबद्दल परमबीरसिंग यांनी काही सांगितलेले नाही !
आता बोला. भारतातील राजकीय नेते गेंड्याची कातडी पांघरून फिरतात, असे म्हणतात, ते खरे आहे की नाही ! पवारांच्या विधानाचा सरळ अर्थ असा की, ठीक आहे. आम्ही मागितले शंभर कोटी. पण तुम्ही दिले कसे ? म्हणजे, का दिले ? आम्ही हजार मागू. तुम्ही द्यायला नको, असेच पवारांना सुचवायचे आहे. प्रत्यक्ष व्यवहारात हे शक्य तरी आहे का ? मंत्र्याचा आदेश एपीआय धुडकावू शकेल ? अर्धशतक सत्ताकारणात मग्न असलेल्या पवारांना हे माहीत नाही काय ? तरी  ते विचारताहेत. याचा अर्थ, “भ्रष्टाचार करणे हा आमचा राजकारणसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो बजावणारच” हेच त्यांना सांगायचे आहे. तुम्ही नैतिकता पाळत बसा हवी तर, असा संदेशही त्यात दिसतो. कोणापुढे डोके फोडून घेत आहोत आपण ?
याच पत्रपरिषदेत पवारांनी आणखी एक चाल खेळून पाहिली. या प्रकरणाची चौकशी सुपर काँप ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या ज्येष्ठ माजी अधिकाऱ्याने करावी, असे त्यांनी साळसूदपणे सुचविले. रिबेरो हे मोदी सरकारविरोधक आणि कथित पुरोगामी मानले जातात. त्याचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न होता. पण तो फसला. नव्हे, पवारांवरच उलटला ! अशा घाणेरड्या प्रकरणात मी हात घालत नाही, असे ठणकावत 92 वर्षीय रिबेरोंनी प्रस्ताव स्वत:च फेटाळून लावला आणि पवारांचा डाव हाणून पाडला. वरून, तुम्हीच करा ना देशमुखांची चौकशी, असा नेत्यांना सल्ला देत त्यांनी पवारांना तोंडघशीही पाडले !
परमबीरसिंग यांचे पत्रच खोटे आहे. कारण, ज्या ईमेल अँड्रेसवरून ते आले तो आणि सरकारकडे नोंदलेला त्यांचा ईमेल अँड्रेस एक नाही. तसेच या पत्रावर स्वाक्षरी नाही, असे सांगत मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच करण्यात आला. (मुख्यमंत्री कार्यालयाकडून ईमेलबाबत अजूनही खुलासा झालेला नाही.) तो फसला. कारण, परमबीरसिंगांनी आपल्या आरोपांचा इन्कार केला नाही. मौनम् संमती लक्षणम्…! उलट, आता तर परमबीरसिंगांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेऊन, पत्र आपणच पाठविले आहे, यावर शिक्कामोर्तबच केले. आज ते मुंबई हायकोर्टात जाणार आहेत. आता काय करावे महाविकास आघाडी सरकारने ?
तर, परमबीरसिंगांचे पत्र म्हणजे भाजपाच्या कटकारस्थानाचा भाग आहे, असा नवा पवित्रा त्यांनी घेतला. शरद पवार सूचक बोलले, तर त्यांचे सहकारी नवाब मलिक उघड म्हणाले. तसे होते तर पवारांपासून राऊतांपर्यंत अनेकांनी पत्राची दखलच का घेतली ? पत्राची सत्यासत्यता पूर्ण पडताळून पाहूनच ठरवायचे होते ना. स्वत:चा बचाव करण्याची एवढी घाई कशाला केली गेली ? दालमें कुछ काला होगा, तभी ना, दया !
और वो काला है सचिन वाझे ! या प्रकरणाचा मुख्य (खल)नायक. त्याचा गुन्हा जवळजवळ सिद्ध झाल्यात जमा आहे. वाझे आणि परमबीरसिंग दोघेही कालपरवापर्यंत “सामना”ला हिरो वाटत होते. पण, एटीएसच्या चौकशीत वाझेचे पितळ उघडे पडणार, हे लक्षात येताच परमसिंगांना हाताशी धरून शिवसेनेने राष्ट्रवादीवर पलटवार तर केला नसेल ? दुसरीकडे, मनसेचे राज ठाकरे यांनी, अंबानी-ठाकरे-वाझे “मधुर” संबंधाचा त्रिकोण सांगत विचारले की, जिलेटिन पेरलेली कार कोणाच्या आदेशाने ठेवली गेली ? त्यांचा अंगुलीनिर्देश एखाद्या गुजराती माणसाकडे दिसत आहे. याबाबत चौकशीतून नेमके कळेल, अशी आशा आहे.
एकूणच, वाझेमुळे शिवसेना अडचणीत आली आहे, तर राष्ट्रवादीसाठी अनिल देशमुख प्रतिष्ठेचा मुद्दा झाले आहेत. त्यामुळेच एकमेकाविरुद्ध डावपेच लढवले जात असल्याचे उघड दिसते. त्यांच्यात शीतयुद्ध आणि कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आजतरी राष्ट्रवादी पुढे दिसते. देशमुखांना हात लावायचा नाही, यावर राष्ट्रवादी ठाम आहे, तर  वाझेमुळे शिवसेनेला बँकफूटवर जावे लागले आहे. यातील एकालाच “परमवीर”चक्र मिळू शकेल ! परंतु ते दोघांनाही हवे आहे !! आणि, तिसरा मित्रपक्ष काँग्रेस यात खिजगणतीतही नाही !!! राज्य स्तरावरील स्थानिक पक्षांच्या खंडणी-संघर्षात या राष्ट्रीय पक्षाने (आपला वाटा मागण्यासाठी !) टाळ्या वाजविण्याचे काम पत्करले आहे. अरेरे ! सत्ता टिकविण्यासाठी किती हा निर्लज्जपणा म्हणायचा !Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.