चक्क पोलिस अधीक्षकाच्याच नावानं बोगस फेसबुक अकाऊंट!

Share This News

यवतमाळ : पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन मित्रांकडे पैश्यांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार यवतमाळात घडला आहे. हा प्रकार लक्षात येताच पोलिस अधीक्षकांच्या एका फेसबुक मित्राने रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांना ही माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सोमवारी बनावट अकाऊंट बंद करून शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा फोटोही या बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला होता. पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावाने ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. एका अज्ञात भामट्याने ‘एसपी यवतमाळ’ नावाने नवीन फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यानंतर त्या अकाऊंटवरून अनेकांशी चॅटिंग सुरू केली. त्यासाठी त्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरले. अशात भामट्याने पोलिस अधीक्षकांचे मित्र व नातेवाइकांशी मॅसेंजरव्दारे संपर्क साधत आर्थिक अडचणीत आल्याचे सांगितले. त्यानंतर मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर पैश्याची मागणी सुरू केली. गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा असे मॅसेज अनेकांना केले. या प्रकारामुळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्याने थेट पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली. त्यावेळी एसपी यवतमाळ नावाने बनावट अकाऊंट तयार झाल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणामूळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोमवारी सकाळी पोलिसांनी ते बनावट अकाऊंट तत्काळ बंद केले. त्यानंतर यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शहर पोलिसांनी बनावट अकाऊंट बनवणाऱ्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. याप्रकरणी यवतमाळ जिल्हा सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर बनावट अकाऊंट बंद केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.