परतवाड्याहून पर्यटनगरीकडे जाणारे दोन्ही मार्ग उद्ध्वस्त

Share This News

परतवाडा : पर्यटननगरी चिखलदराकडे परतवाडा शहरातून जाणारे दोन्ही प्रमुख ब्रिटिशकालीन मार्ग उद्ध्वस्त झाले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे या दोन्ही मार्गांची चाळणी झाली आहे. पर्यटकांसह वाहनचालक व स्थानिक रहिवाशांच्या जिवावर हे मार्ग उठले आहेत.  परतवाडा शहरातून धामणगाव गढी आणि घटांग मार्गाने असे दोन प्रमुख रस्ते चिखलदरा पर्यटननगरीकडे वळतात. यात धामणगाव गढी मार्गाची स्थिती वाईट आहे. मनभंगपासून मडकीपर्यंत तर काही भागात रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. परतवाडा-धारणी मार्गावर घटांगपासून वळणाऱ्या रस्त्याची स्थिती तर शब्दापलीकडची ठरली आहे. शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावर ट्रॅक्टरमुळे पडणाऱ्या खोलगट चवऱ्यांप्रमाणे धोकादायक चवरे या डांबरी रस्त्यावर पडले आहेत. खड्ड्यांच्या परिभाषेच्या बाहेरील ते आहेत. रस्ता कमी अन्  खड्डे आणि चवऱ्यांमधून वाहन काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. चिखलदऱ्याला परतवाडा शहरातून दोन मार्ग जातात. यातील अचलपूर-घटांग-सलोना हा ४८.२८ किलोमीटर (३० मैल) चा पहिला व सर्वांत जुना मार्ग. इंग्रज या रस्त्यानेच चिखलदऱ्याला जाणे पसंत करायचे. घोडागाडीने ते जायचे. घटांगच्या रेस्टहाऊसवर त्यांचा मुक्काम राहायचा. या मार्गानेच स्टिव्हन्सन सैन्य घेऊन लवादा व तेथून गाविलगडावर दाखल झाला होता. दुसरा रस्ता धामणगाव गढी-मोथा मार्गे ३४ किलोमीटर (२१ मैल) चा आहे. जनरल वेलेस्लीने १८०३ मध्ये हा मार्ग शोधून काढला. चिखलदऱ्याकरिता हा जवळचा मार्ग असून, पर्यटकांची त्यास पसंती आहे. याच जवळच्या मार्गाला बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव धनंजय धवड यांच्याकडून राजाश्रय मिळाला. हा मार्ग राज्य महामार्ग ३०५, तर इंग्रजांच्या वहिवाटीतील पहिला मार्ग हा प्रमुख जिल्हा मार्ग ८ म्हणून ओळखला जातो.  मान्यता मिळूनही काम नाही पर्यटननगरीकडे जाणाऱ्या या दोन्ही प्रमुख मार्गांच्या कामाला वन व वन्यजीव विभागाने १९ ऑक्टोबर २०२० रोजी मान्यता दिली. रस्त्याचे रुंदीकरण न करता आहे त्या स्थितीत मजबुतीकरणासह डांबरीकरणास मान्यता आहे. मान्यता मिळूनही या उद्ध्वस्त रस्त्याच्या कामास वृत्त लिहिस्तोवर सुरुवात झालेली नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.