चंद्रपूर : खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट सुरूच
महानगरपालिकेकडून अनेकदा संबंधित रुग्णालयांना स्मरणपत्रे पाठविली. परंतु रुग्णालयाकडून या स्मरणपत्राला कवडीची किंमत दिली जात नाही. उलट देयकांची तपासणी होऊ नये, यासाठी राजकीय दबाव आणला जातो. त्यामुळे कोरोनाच्या संकटात राजकीय दबावापुढे अधिकारी हतबल झाले आहेत. टाळेबंदी उठल्यानंतर राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला. शासकीय सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोलमडली, त्यानंतर खासगी रुग्णालयांना कोविड उपचार केंद्र सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. परंतु येथे उपचारासोबतच कोरोनाबाधितांच्या लुटीचे प्रकार समोर आले. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा देयक उकळले गेले. राज्यात अनेक ठिकाणी यावरून वादही झाले. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयातील दर निश्चिती शासनाकडून करण्यात आली. परंतु लुटीचा प्रकार थांबला नाही. शेवटी शासनाने रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लेखापरीक्षक अधिकार्यांच्या नेतृत्वात लेखाअधिकार्यांची चमू रुग्णालयात तैनात केली. या लेखाअधिकार्यांकडे रुग्णांनी अदा केलेल्या देयकांची कागदपत्र पाठवायची होती. परंतु चंद्रपुरातील बहुतांश खासगी कोविड सेंटरनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले. शहरात सध्या सुमारे १३ खासगी कोविड सेंटर सुरू आहे. येथील कोरोना बाधितांच्या देयकांच्या तपासणीसाठी मनपाचे मुख्य लेखापरीक्षकांच्या नेतृत्वात १७ लेखाअधिकार्यांचे पथक तयार केले. प्रकल्पअधिकार्याला एका रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली. परंतु एकाही रुग्णालयांनी कोरानोबाधितांची नियमित देयक संबंधित अधिकार्यांकडे पाठविली नाही. आतापयर्ंत चंद्रपुरातील सर्वच खासगी कोविड रुग्णालयात दाखल रूग्णांपैकी केवळ दहा टक्केच देयक लेखा अधिकार्यांकडे पाठविण्यात आले. यासंदर्भात मनपाने अनेकदा स्मरणपत्र दिली. परंतु याची दखल या रुग्णालयांनी घेतली नाही. जवळपास पन्नास कोरोना बाधितांनी मनपाकडे आतापयर्ंत तक्रारी केल्या आहे. तक्रारीच्या अनुषंगाने मनपाने अनेकदा स्मरणपत्र पाठविली. परंतु बहुतांश रूग्णालयांनी स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुन्हा मनपाने रुग्णालयांना कोरोना बाधितांच्या देयकांची आठवण करून दिली आहे. |