राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता Center approves vaccination of 134 private hospitals in the state

Share This News

कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या

तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटाचे लसीकरण पूर्ण करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उच्चांकी रुग्ण संख्येमुळे काटेकोर निर्बंध पाळण्याचेही जिल्ह्याना निर्देश

मुंबई दि 18: एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वाना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगताना येणार उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

ते आज विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे लसीकरण संदर्भात बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दररोज ३ लाख लस दिली पाहिजे

दरम्यान राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना काल केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे ,निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे मात्र दर दिवशी ३ लाख लस दिली पाहिजे यादृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आरोग्य विभागास सांगितले.

कोविड लसीकरणात अव्वल स्थानी

कोविड लसीकरणात आज 18 मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वल स्थानी आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली . आत्तापर्यंत दोन्ही मिळून 36 लाख 3 हजार 424 डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान 36 लाख 84 हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे असे दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसते. कालच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंतप्रधानांसमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत महाराष्ट्रातील लसीकरण प्रमाण चांगले आहे असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे असले तरी दिवसाला 3 लाख डोस देऊन लसीकरण वाढविण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी देखील लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

महाराष्ट्राने 31 लाख 5 हजार 169 पहिला डोस आणि 4 लाख 98 हजार 255 दुसरा डोस असे लसीकरण केले आहे. तर राजस्थानने 30 लाख 92 हजार 635 पहिले डोस व 5 लाख 92 हजार 208 दुसरे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेशने एकूण दोन्ही मिळून 32 लाख 46 हजार 323, पश्चिम बंगालने 30 लाख 17 हजार 35, गुजरातने 28 लाख 53 हजार 958 असे दोन्ही मिळून डोस दिले आहेत. त्यानंतरची इतर काही राज्ये पुढीलप्रमाणे आहेत : कर्नाटक 19 लाख 27 हजार 246, केरळ 18 लाख 91 हजार 431, तामिळनाडू 17 लाख 18 हजार 313, मध्यप्रदेश 18 लाख 66 हजार 138, बिहार 16 लाख 34 हजार 65, आंध्र प्रदेश 13 लाख 16 हजार 192, दिल्ली 8 लाख 67 हजार 433

लस वाया जाऊ देऊ नका

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि महाराष्ट्रात इतर काही राज्यांच्या तुलनेत लस विविध कारणामुळे वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ ६ टक्के आहे, ते देखील शून्यावर आले पाहिजे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांप्रमाणेच लसीकरण झाले पाहिजे हे पाहावे.

उन्हाळा लक्षात घेऊन वेळ ठेवा

राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो, त्याचा परिणाम कमी लसीकरणावर होऊ शकतो हे गृहीत धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्री पर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्येष्ठ व सहव्याधी रुग्ण रांगांमध्ये उभे असतात त्यांची गैर सोया होणार नाही व कुठेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाळयात फिल्ड रुग्णालयांची काळजी घ्या

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली फिल्ड रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या व आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करून घ्या जेणे करून पावसाचा त्रास होणार नाही अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

बदलत्या लक्षणांची नोंद घ्या

कोरोना विषाणूच्या बदलत्या लक्षणांची नोंद वैद्यकीय तज्ञांनी घ्यावी तसेच आवश्यक त्या उपचार पद्धतीविषयी राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
याप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संसर्ग असो किंवा लसीकरण, दोघांच्या बाबतीत अधिक मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जन जागृती करावी असे सांगितले. राज्यात एकवेळ होती जेव्हा दिवसाला केवळ २ हजार रुग्ण येत होते. आता गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे , त्यादृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय कर्मचारी व सहायक नियुक्त करा तसेच बेड्सची जादा संख्या कशी उपलब्ध राहील याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.

उच्चांकी संख्या गाठल्याने काळजी घेण्याची गरज

आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी यावेळी सांगितले कि, आपण दिवसेंदिवस लसीकरणाचा वेग वाढवीत असून काळ दिवसाला २ लाख ७५ हजार डोस देण्यात आले. लवकरच आपण ३ लाख डोस दर दिवशी देऊ शकू. प्राधान्य गटात १.७७ कोटी जणांना दोन डोस म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यात ३.५ कोटी डोसची आवश्यकता आहे. अजून साधारणपणे ३ कोटी डोस द्यायचे आहेत. लसीकरण वेग वाढल्यानंतर ३ ते ४ महिन्यात ते पूर्ण होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१७ सप्टेंबर २०२० रोजी असलेल्या रुग्ण संख्येपेक्षा उच्चांकी संख्या गाठली असून अशीच वाढती संख्या राहिल्यास एप्रिल पहिल्या आठवड्यात ३ लाख सक्रिय रुग्ण राज्यात होऊ शकतात. त्यामुळे सर्वानी प्राधान्याने आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.