केंद्रीय पथकाने नागपूर जिल्ह्यातील गावांना दिल्या भेटी; शेतकऱ्यांशी केली चर्चा

Share This News

पारशिवनी तालुक्यातील सालई- माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी आज केली.

नागपूर: पारशिवनी तालुक्यातील सालई- माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी आज केली. पारशिवनी तालुक्यात ग्रामीण पायाभूत विकास निधीतून मनसर- माहुली-सालई- बिटोली येथील पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम २०१८ रोजी पूर्ण करण्यात आले होते. मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ आॅगस्ट २०२० रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलींद बांधवकर, सहाय्यक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए. एस. महाजन, यांच्यासह मंडळ अधिकारी मंडळ राजेश घुडे, तलाठी विश्वजीत पुरामकर पाहणी पथकामध्ये आहेत. केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा आक्रोश गत आॅगस्ट महिन्यात कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या गावाला पुराने वेढले होते. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन अनेकांची घरे पडली.

अनेकांच्या घरातील जीवनाश्यक वस्तूचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेतक?्याच्या शेतातील मोठ्या प्रमाणात पिके उध्वस्त झाली. ही आपती झाल्याच्या चार महिन्यानंतर गुरुवारी केंद्रीय पथक सोनेगाव राजा (ता. कामठी) येथे आले असता स्थाई पट्टी व शासनाकडून घरे बांधण्याकरता निधी देण्याची मागणी पथकासमोर पुरग्रस्तानी केली. 29 आॅगस्ट ला कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या गावाला पुराने वेढले होते. पुराच्या पाण्याने 56 नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले तर 64 नागरिकांच्या घरे पडली होती. 225 हेक्टर जमिनीतील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने पुरग्रस्ताचे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करिता याद्या सादर करण्यात आल्या होत्या. यानंतर काही नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडू मदत सुध्दा मिळाली आहे. मात्र ती अल्प स्वरूपाची आहे. सोनेगाव राजा या गावाला 1994 मध्येसुद्धा पुराने वेढले होते. तेव्हा गावक?्यांनी गावाच्या पुनर्रवसणाची मागणी केली होती. शासनाच्या वतीने गावाशेजारी साडेपाच एकर जागा मंजूर करुन स्थाई पट्टी देण्याचे आश्वासन दिले होते. काही नागरीकांना पट्टे सुद्धा मिळाले काहीनी घरे बांधून वास्तव्य सुद्धा गेले आहेत. सोनेगाव राजा येथील 170 कुटुंबातील नागरिकांना स्थायी पट्टे न मिळाल्यामुळे ते त्याच गावात वास्तव्यास आहेत. 29 आॅगस्टला आलेल्या पुराने संपूर्ण गावाला वेढले होते. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथकाचे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, मुख्य अभियंता नागपूर महेंद्र सहारे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्याम मनुरकर, तहसीलदार अरविंद हिंगे यांचे पथक सकाळी दहा वाजता सुमारास सोनेगाव राजा येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता जिजाबाई शंकर गजभिये ( 60) यांच्या सह 20 महिलांनी केंद्रीय पथकातील सदस्यापुढे आक्रोश व्यक्त करत मदतीची मागणी केली. शासनाच्या वतीने स्थायी पट्टे व घर बांधण्याकरिता निधी देण्याची मागणी त्यानी केली. राहुल महल्ले या शेतक?्याच्या शेतात पथक नुकसानीची पाहणी करण्याकरीता गेले असता महल्ले यांनी, हे शेत मी यांनी हे शेत मी ठेक्याने केले असून या शेतातील संपूर्ण पीक नष्ट झाले असून मला कुठल्याही प्रकारची शासनाच्यावतीने मदत मिळाली नाही असे पथकातील सदस्यांना सांगितले.

मधुकर देवाजी चौधरी यांची एक गाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. परंतु आज पर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसून त्यांनी ही केंद्रीय पथकासमोर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गावातील नामदेव दाजीबा ढोले, बंडू चौधरी यांनीही स्थायी पट्टे देण्याची मागणी केली. सोबतच काही पूरग्रस्तांना शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून नुकसानग्रस्त भागाचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तहसीलदार यांना परत पाठवून माहिती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मौद्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत,नायब तहसीलदार रणजीत दुसावार, सोनेगाव राजाचे सरपंच चंद्रकांत हेवट यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.