चंद्रपूर- आरटीओ कार्यालयातील निरीक्षकांना धमकावणाऱ्या खंडणीखोर दलालाला अटक
चंद्रपूर आरटीओ कार्यालयातील निरीक्षकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या एका दलालाला अखेर अटक करण्यात आली. अशोक मत्ते असं या खंडणीखोर दलालाचं नाव असून, तो चंद्रपुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात या कार्यालयाशी संलग्न कामं करतो.
एका राजकीय पक्षाशी जोडला गेलेला हा दलाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाला सातत्यानं पैशांची मागणी करीत होता. 40 हजार रुपये महिना द्या, अशी त्याने मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करण्याची धमकी तो देत होता. पत्रकार आणि नेत्यांच्या ओळखीचे संदर्भ देऊन मोटार निरीक्षकाला सतत धमकावत होता. शेवटी, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदर मोटार निरीक्षकाने पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार चंद्रपूर शहरातील जिल्हा क्रीडांगणावर अशोक मत्ते याला पैसे देण्यासाठी बोलावण्यात आलं. तिथं 40 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. विशेष पथक नेमून पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली. राजकीय पक्षातील काही नेत्यांच्या अगदी जवळचा माणूस म्हणून अशोक मत्ते याने आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळं त्याच्या अटकेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नेत्यांसाठी जेवणावळी आयोजित करणं, प्रचारात सक्रिय सहभागी होणं अशी अनेक कामं करून या दलालाने नेत्यांच्या जवळचं स्थान पटकावलं. या नेत्यांचा आशीर्वाद असल्यानं त्याची हिंमत वाढत गेली. त्याच्या लीला वाढतच गेल्या. विशेषतः आरटीओ कार्यालयाला लक्ष्य करीत अधिकाऱ्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा सपाटा त्याने लावला. पण शेवटी, एका धाडसी अधिकाऱ्याने हिम्मत करून, त्याला धडा शिकवला.