चंद्रपूर : रात्री एक वाजता ‘घरांच्या प्रश्नाबाबत’ असंख्य महिला मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतात तेव्हा
चंद्रपूर, २९ जानेवारी, : आम्हाला हक्काचे आणि अधिकृत घर हवे या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील मूल शहरातील असंख्य महिलांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यावर असलेले प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवारी रात्री एक वाजता भेट घेऊन मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे २८ जानेवारीपासून विदर्भ व खान्देश राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यावर असताना चंद्रपूर जिल्हयातील मूल शहरातील असंख्य महिलांनी भेट घेत गार्हाणी मांडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिक्युरिटीच्या गराड्यातून आपला ताफा थांबवत जमलेल्या महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी अधिकृत घरे करून मिळावित अशी मागणी केली. यावेळी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तुमच्या मागणीचा नक्कीच विचार करतो, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. इतक्या रात्री एक मंत्री आपल्याला भेटतात आणि आपल्या समस्या जाणून घेतात याबद्दल महिलांच्या चेहर्यावर समाधान पाहायला मिळाले. दरम्यान शुक्रवारी मूल शहरातील असंख्य महिलांची मागणीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.