चंद्रपूर : सीडीसीसी बँकेतील घोटाळ्याचा तपास सुरू
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एका शाखेच्या रोखपालाने केलेल्या अफरातफरीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रोखपाल निखिल घाटे अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा नेमका खुलासा होणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जिल्हा परिषद कार्यालयासमोर शाखा आहे. या शाखेत रोखपाल असलेल्या निखिल घाटेने ग्राहकांची फसवणूक केल्याचे पुढे आले. ग्राहकांनी दिलेले पैसे खात्यात न टाकता त्याने स्वतःच्या खिशात टाकले आहेत. अपहाराचा हा प्रकार गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होता. बँकेशी संलग्न चंद्रपूर येथील जनता शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था यांनी तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. आरोपी घाटे हा त्याच्या दालनाची किल्ली शाखेत देऊन कुणालाही न सांगता पसार झाला. पंचनामा केल्यानंतर रोख रक्कम, खातेदारांचे पासबुक आणि शिक्के मारलेल्या पावत्या त्याच्या दालनात आढळून आल्या. आता आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी घाटे याचा शोध सुरू आहे. प्राप्त तक्रारीवरून रोखपालाने २ कोटी ८ लाख ५६ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले आहे.