ट्रॅक्टर-कारची भीषण धडक, बर्थडे बॉयच्या डोळ्यांदेखत चौघा मित्रांचा मृत्यू
चंद्रपूर : ट्रॅक्टर आणि कारच्या धडकेत चार तरुणांना प्राण गमवावे लागले. बर्थडे पार्टीवरुन घरी येताना चंद्रपूरात कारचा भीषण अपघातझाला. दैव बलवत्तर म्हणून वाढदिवस असलेला मित्र या अपघातातून वाचला, मात्र डोळ्यांदेखत चार मित्रांचे मृत्यू पाहण्याचा वेळ त्याच्यावर आली.
कारने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत चौघा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात काल रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील आहेत
योग गोगरी या तरुणाचा 23 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र हॉटेलमध्ये गेले होते. चंद्रपुर रोडवरील एका हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर रात्री उशिरा सर्व जण घरी येण्यासाठी निघाले.
चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागातून जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आल्याची माहिती आहे. वेगात असलेली गाडी ट्रॅक्टरवर धडकल्यानंतर तिचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातात दर्शना उधवाणी (25), प्रगती निमगडे (24), मोहम्मद अमन (23) आणि स्मित पटेल (25) या चौघांना प्राण गमवावे लागले. तर बर्थडे बॉय योग गोगरी (23) हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार आहेत. घरातील तरुण पोरांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मूल शहरात शोकाकुल वातावरण आहे.
लग्नावरुन परतताना काळाचा घाला
विवाह सोहळा आटोपून गंगाखेड-परळी रस्त्याने परत परळीमार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या ऑटोरिक्षाला ट्रकने धडक दिल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. या अपघातात ऑटोचा चुराडा झाल्यामुळे अंबाजोगाईतील चौघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.