चंद्रपूरचा पारा उसळला, रेकॉर्ड तापमानाची नोंद; महाराष्ट्रात उन-उकाड्याने नागरिक हैराण

Share This News

चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह सुर्य कोपण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे लॉकडाऊनची दहशत तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे. राज्यात कालचे सर्वाधिक तापमान चंद्रपुरात 43.6 डिग्री सेल्सियस असून संपूर्ण विदर्भातील तापमानात गेल्या 3 दिवसात मोठी वाढ झाली आहे. अचानक वाढलेल्या या तापमानामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणखी काही दिवस तापमान वाढत असल्याच्या अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यामुळे अनेकजण शीतपेये, उसाचा रस, फळांच्या रसांनी वाढत्या तापमानाचा सामना करत आहेत. शहरात एरवी सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने पाणपोया थाटून प्रवाशांची तहान निशुल्क भागवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, कोरोनो दहशतीने या पाणपोया देखील सुरू न झाल्याने शहरात येणाऱ्या गरीब घटकातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यात ऊन तापू लागले असून परभणीकरांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मागील चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज परभणीचे तापमान 39.7 अंशांवर पोहोचले आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करावे लागत आहेत.

येत्या चार दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घेत कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणं शक्य तितकं टाळावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची आणि आहाराची काळजी घ्या. वेळीवेळी पाणी प्या, शरीराला थंड करणाऱ्य़ा भाज्या आणि फळं खा. जेवणाच्या वेळा पाळा आणि शरीराला त्रास होईल असं काहीही खाऊ नका.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.