आपल्यालाही हवामानाप्रमाणे शेतीत बदल करावे लागणार

Share This News

हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, उष्ण तापमान आदी घटक शेतीवर परिणाम घडवू लागले आहेत. भविष्यात हवामानाशी सुसंगत उपाययोजना वा तंत्रज्ञानाचा शोध व त्याकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यावर टाकलेला संक्षिप्त दृष्टीक्षेप.

अँटीहेल झेलेल गारांना करील पिकांचे संरक्षण
गारपीट व अवकाळी पावसाने महाराष्ट्रात नुकताच हाहाकार उडवला. मात्र शेतकऱ्यांनी हतबल होण्याची गरज नाही. पिकांचे अशा आपत्तीपासून संरक्षण करण्याचे उपाय आहेत, जगभरात ते वापरलेही जातात. त्याविषयी.
नेटहाऊस क्षेत्रातील काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अँटिहेल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकेल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. ऍग्री प्लास्ट कंपनीचे राजीब रॉय यांना नेटहाऊस विषयातील अनेक वर्षांचा अनुभव आहे. नागपूर येथे लवकरच आपण यासंबंधीचा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातस्थित नील ऍग्रिटेक कंपनीचे अधिकारी अनंत पाटसकर यांच्या मते अँटिहेलसारख्या नेटसाठी प्रति चौरस मीटरचा खर्च 70 ते 80 रुपये याप्रमाणे एकरी तो तीन लाख रुपयांपर्यंत येऊ शकेल. मात्र त्यासाठी लागणाऱ्या हार्डवेअरचा खर्च वेगळा असेल.

गारा तयार न होऊ देणारे यंत्र
गार तयार होण्याची अवस्थाच बिघडवून टाकण्याचे काम छायाचित्रात दिसणाऱ्या या यंत्राद्वारा केले जाते. ज्या वेळी वादळी हवामान स्थिती तयार होते, गारा पडण्याची शक्‍यता दिसू लागते, त्या काळात त्याचा वापर करायचा असतो. या यंत्रात विशिष्ट पद्धतीने तयार केलेला ब्लास्ट चेंबर आहे. त्याद्वारा ऍसिटीलीन वायू आणि हवेला उद्दिप्त केले जाते. त्यातून स्फोटासारखा दाब उत्पन्न होऊन त्याच्या तीव्र लहरी तयार होतात. त्यांचा मोठा आवाज निर्माण होतो.
ध्वनीच्या वेगाने त्या आकाशात घुसतात. त्यांच्याद्वारा गार तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा तयार होऊन तिची निर्मिती थांबवली जाते. मात्र गार जर तयार झालेली असेल तर ती मात्र या यंत्राद्वारा वितळवता येत नाही. पाचशे मीटरच्या परिघापर्यंत हे यंत्र प्रभावशाली काम करू शकते. प्रत्येकी चार सेकंदांनी या यंत्राद्वारा अशा प्रकारे फायरिंग करता येते. यंत्र चालू-बंद करण्यासाठी मनुष्यबळाऐवजी रडार नियंत्रित यंत्रणेचा वापरही केला जाऊ शकतो. न्यूझीलंडमधील एका कंपनीने हे यंत्र विकसित केले असून अनेक वर्षांपासून या देशात त्याचा वापर केला जातो.
गारारोधक नेट तंत्रज्ञानाविषयी
गारारोधक नेट तंत्रज्ञानाविषयी तमिळनाडूस्थित ऍग्रीप्लास्ट कंपनीचे राजीब रॉय यांनी दिलेली माहिती अशी
⦁ गारा (हेल), हिमवर्षाव (स्नो) आदींपासून पिकांचे संरक्षण करता येते. मात्र बर्फाच्या गोळ्यांचे ओझे सहन करण्याची ताकद व क्षमता असलेले नेट वापरावे लागेल. महाराष्ट्रात नुकतीच झालेली प्रचंड स्वरूपाची गारपीट हा तसा पहिलाच मोठा अनुभव असल्याने यापूर्वी त्यावर फारसा विचार झाला नव्हता. मात्र आता नागपूर जिल्ह्यात आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
⦁ स्थानिक भौगोलिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन त्या पद्धतीच्या नेटहाऊसचा अभियांत्रिकी आराखडा वा संरचना तयार करणे गरजेचे आहे. विविध प्रकारचा भाजीपाला, फुले, केळी, लिंबूवर्गीय फळे व अन्य फळांत गारारोधक नेटचा (अँटीहेल) वापर परदेशात केला जातो. पडणाऱ्या गारांचा वेग हा मुख्य मुद्दा असणार नाही, तर नेटची गुणवत्ता अशी हवी की पडणाऱ्या गारांचा प्रभाव झेलण्याबाबत “फ्लेक्‍सीबल’ असण्याचा गुणधर्म त्यात असायला हवा. प्रति मीटर वर्ग क्षेत्रफळात जमा होणाऱ्या गारा वा बर्फकणांचा प्रभाव नेटहाऊसच्या आराखड्याशी संबंधित आहे.
⦁ अशा स्वरूपाच्या नेटहाऊसचे डिझाईन वा बांधणी नेहमीच्या नेटहाऊसच्या तुलनेत वेगळीच करावी लागते. पीक कोणते आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, पाऊसमान, प्रति मीटर क्षेत्रफळात जमा होणाऱ्या कमाल गारांची संख्या या घटकांवर त्याची बांधणी अवलंबून आहे.
⦁ खर्च – पिकाचे क्षेत्र, अँटीहेल नेटहाऊसची संरचना यावर खर्च अवलंबून आहे. प्रति चौरस मीटरला तो 200 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत येऊ शकतो. एकरी सुमारे 4000 चौ.मी. क्षेत्र हिशेबाने हा खर्च 12 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. त्याला कृषी विभागाचे 50 टक्के किंवा त्याहून अधिक अनुदान मिळाले तर हा खर्च कमी होऊ शकतो.
⦁ गारपीट ही वर्षातील काही ठराविक काळातच होते असे गृहीत धरल्यास वर्षातील उर्वरित काळासाठी नेट काढूनही ठेवता येते. यातील 95 टक्के “मटेरिअल’ एका जागेपासून दुसऱ्या जागी हलवताही येते. नेटहाऊसची गुणवत्ता, हवामान परिस्थिती यांचा निकष धरल्यास हे नेट दहा वर्षांपर्यंत टिकून राहू शकते.
 
इस्राईल किंवा जगभरात अशा प्रकारचे प्रकल्प यशस्वी झाले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.